मुंबई : सर्वच प्रमुख पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. 15) मतदान होणार असून, शुक्रवारी (दि. 16) सकाळपासून मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत 2 हजार 869 नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत.
बृहन्मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, वसई-विरार, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, लातूर, परभणी, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर, नांदेड-वाघाळा, सांगली-मिरज-कुपवाड, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, इचलकरंजी आणि जालना या महानगरपालिकांसाठी मतदान होत आहे.
निवडणुकीसाठी 15 हजार 908 उमेदवार रिंगणात असून, मुंबईत सर्वाधिक 1,700 उमेदवार आहेत. सर्वात कमी म्हणजे 230 उमेदवार इचलकरंजीमध्ये आहेत. तेथे 65 जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यात सत्तेत एकत्र असलेली महायुती कोल्हापूर, इचलकरंजी अशा मोजक्याच ठिकाणी एकत्र आहे; तर शिवसेना-भाजप यांची मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीसह 29 पैकी 11 ठिकाणी युती आहे.
उर्वरित ठिकाणी ते एकमेकांविरोधात आहेत. अजित पवार आणि शरद पवार हे काका-पुतणे प्रथमच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांमध्ये एकत्र आले आहेत; तर पंचवीस वर्षांपूर्वी वेगळे झालेले उद्धव आणि राज ठाकरे यांचीही युती झाली आहे.
काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचीही मुंबईत पहिल्यांदाच आघाडी झाली आहे. मतदार कोणाच्या बाजूने कौल देतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मतदानाचे प्रमाण वाढावे व नागरिकांना आपला हक्क बजावता यावा, यासाठी राज्य सरकारने 15 जानेवारी रोजी मतदान होणाऱ्या महापालिका क्षेत्रांत शासकीय व खासगी कार्यालयांना सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.