Maharashtra monsoon withdrawal 2026  pudhari photo
मुंबई

Maharashtra monsoon withdrawal 2026 : कोरड्या पावलांनी परतला मान्‍सून

हवामान विभागाची घोषणा; कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : वृत्तसंस्‍था

संपूर्ण राज्यातून मोसमी पावसाने माघार घेतल्याची घोषणा गुरुवारी (दि. ८) हवामान विभागाने केली. पुढील काही दिवसांत कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. अनेक दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात हवामान कोरडे असून उकाड्यात काहीशी वाढ झाली आहे. यंदा राज्यात सरासरी तारखेहून दोन दिवस आधीच मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला होता.

मोसमी पावसाच्या संपूर्ण हंगामावर ‘अल निनो’चा असलेला प्रभाव, पावसाचा अभाव आणि ऑगस्ट महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेली तूट यामुळे यंदा नागरिकांना तीव्र दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. राज्यातून मोसमी पाऊस माघारी फिरण्याचा सरासरी कालावधी ५ ते १० ऑक्टोबर आहे. मात्र, यंदा दोन दिवस आधीच संपूर्ण राज्यातून मोसमी पावसाने माघार घेतली आहे.

राज्यात शनिवारपासून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला. मोसमी पावसाची परतीची रेषा ब्रह्मपुरी, परभणी, बारामती आणि हर्णे येथे बुधवारपर्यंत स्थिर होती. त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास काहीसा रेंगाळला होता. त्यानंतर गुरुवारी उर्वरित राज्यातून मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली. सप्टेंबर महिन्यातही राज्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली नसल्याने ५२ टक्के इतकी तूट निर्माण झाली, तर मोसमी पावसाच्या संपूर्ण हंगामात यंदा १९ टक्के इतकी पावसाची तूट आहे.

दरम्यान, दुष्काळसदृश स्थितीचा सर्वाधिक फटका विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना बसताना दिसत आहे. सध्या राज्यातील काही भागांत कमाल तापमानात ३ ते ४ अंशांनी वाढ झाली असून ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. कोकण प्रदेशातही उन्हाचा तडाखा असून येथील कमाल तापमानात वाढ झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT