मुंबई : मासिक पाळीच्या काळात महिलांना सुट्टी देता येईल काय, यासाठी विधी आणि न्याय विभागाकडून सल्ला मागविला जाईल, असे स्पष्ट करतानाच प्रसूतीपूर्व लिंगनिदान रोखण्यासाठी या कायद्यातील कलमे अधिक कठोर करण्याचा विचार करू, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी विधानसभेत दिली.
मासिक पाळीच्या काळात महिलांना सुट्टी देण्यात यावी आणि स्त्रीभ्रूण हत्या करणाऱ्यांना ‘मोका’ लावण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. श्रीरामपूरचे काँग्रेस आमदार हेमंत ओगले, भाजपच्या नमिता मुंदडा, काँग्रेसच्या ज्योती गायकवाड यांनीही मासिक पाळीच्या काळात महिलांना सुट्टी देण्याची मागणी केली.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर मोबाईल व्हॅनमधून पोर्टेबल मशिनच्या माध्यमातून टेस्ट केली जाते. सीमावर्ती गावांत प्रसूतीपूर्वी गर्भलिंग निदान चाचणी करून नंतर स्त्रीभ्रूण हत्या केली जात असल्याचा मुद्दा बाबासाहेब देशमुख यांनी मांडला. जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे यांनी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतल्यास प्रश्न सुटतील, अशी सूचना केली.
बेकायदा गर्भलिंग तपासणी करणाऱ्या केंद्रांची माहिती देण्यासाठी खबरीला 1 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. अशी माहिती मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले. तसेच, राज्यात दर हजारी स्त्री-पुरुष गुणोत्तरात काही जिल्ह्यांमध्ये चांगल्या प्रकारे वाढ होत आहे. यात लातूर जिल्हा पुढे असून, तिथे स्त्री-पुरुष गुणोत्तर 1,265 इतके आहे. वर्धा 1,173, धाराशिव 1,050, गडचिरोली 1,093 आणि गोंदिया येथे 1,050 इतके गुणोत्तर असल्याचे त्यांनी सांगितले.