MBBS BDS admission 2026 pudhari photo
मुंबई

MBBS BDS Admission 2026: MBBS-BDS प्रवेश हुकला? विद्यार्थ्यांना पुन्हा संधी; नोंदणीसाठी आज शेवटची मुदत

नव्याने नोंदणीची संधी; २ नोव्हेंबरला सायंकाळी ५.३० पर्यंत मुदत

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यातील एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्य कोट्यातील रिक्त जागा भरण्यासाठी विशेष प्रवेश फेरीअंतर्गत नव्याने नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ऑनलाइन नोंदणी व सत्रासाठी अर्ज करण्याची मुदत २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपणार आहे. नोंदणी शुल्क भरण्यासाठी त्याच दिवशी सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत, तर आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यासाठी रात्री ८ वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे. कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी ३ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतरची प्रवेश प्रक्रिया आणि पुढील वेळापत्रक लवकरच जाहीर केले जणार आहे.

वैद्यकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) विशेष रिक्त जागा प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर राज्य कोट्यातील प्रवेशांसाठी ही सुविधा महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने उपलब्ध करून दिली आहे.

या कालावधीत नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार केवळ एमबीबीएस आणि बीडीएस या अभ्यासक्रमांच्या गट-अ प्रवेश प्रक्रियेसाठी केला जाईल. त्यांना गट-ब आणि गट-क अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी या नोंदणीचा उपयोग करता येणार नाही २७ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या अभ्यासक्रमनिहाय प्रवेशस्थितीनुसार, राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या एकूण ८ हजार ८१४ जागांपैकी ८ हजार ७३० जागांवर प्रवेश झाले असून, ८४ जागा रिक्त आहेत.

यामध्ये शासकीय, पालिका आणि केंद्रीय संस्थांमधील ५ हजार ६५ जागांवर प्रवेश झाले असून, या गटात एकही जागा रिक्त नाही. खासगी महाविद्यालयांमध्ये ३ हजार २९९ जागांपैकी ३ हजार २६० जागांवर प्रवेश झाले असून, ३९ जागा शिल्लक आहेत. खासगी विद्यापीठांमध्ये ४५० जागांपैकी ४०५ जागांवर प्रवेश झाले असून, ४५ जागा रिक्त आहेत.

बीडीएसच्या एकूण २,६१७ जागांपैकी २,५६३ जागांवर प्रवेश झाले. तर ५४ जागा रिक्त आहेत. शासकीय आणि पालिकेच्या महाविद्यालयांतील ३१७ जागांपैकी ३१५ जागा भरल्या असून, दोन जागा रिक्त आहेत.

खासगी महाविद्यालयांतील २,२०० जागांपैकी २ हजार १७८ जागांवर प्रवेश झाले असून, २२ जागा शिल्लक आहेत. खासगी विद्यापीठातील १०० जागांपैकी ७० जागांवर प्रवेश झाले असून, ३० जागा रिक्त आहेत. अशा प्रकारे एमबीबीएस आणि बीडीएस या दोन्ही अभ्यासक्रमांच्या एकूण ११,४३१ जागांपैकी ११,२९३ जागांवर प्रवेश झाले असून, १३८ जागा रिक्त आहेत.

नोंदणीपूर्वी पात्रता अटी तपासण्याचे आवाहन

या विशेष प्रवेश फेरीसाठी यापूर्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करता येणार नाही. मात्र, एमबीबीएस आणि बीडीएसच्या दुसऱ्या प्रवेश फेरीत जागा मिळाल्यानंतर प्रवेश न घेतलेल्या, अहवाल न दिलेल्या किंवा जागा रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना, त्यांनी कॅप-३ फेरीदरम्यान यापूर्वी नोंदणी केलेली नसल्यास, नव्याने नोंदणी करण्याची संधी आहे. कॅप-३ किंवा त्यानंतरच्या कोणत्याही रिक्त जागा प्रवेश फेरीत जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांना या नव्या नोंदणी प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT