MBBS Admission 2026 pudhari photo
मुंबई

Medical Admission 2026 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील जागा भरल्या

एमबीबीएस, बीडीएसचे ९८.७९ टक्के प्रवेश पूर्ण; राज्यात अजूनही १३८ जागा रिक्त

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यात यंदा एमबीबीएस आणि बीडीएस या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत ९८.७९ टक्के जागा भरल्या आहेत. राज्यातील ९९ वैद्यकीय महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या ११ हजार ४३१ जागांपैकी ११ हजार २९३ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, १३८ जागा रिक्त राहिल्या आहेत. एमबीबीएस अभ्यासक्रमाचे ९९.०४ टक्के, तर बीडीएसचे ९७.९३ टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएसच्या सर्व ५ हजार ६५ जागांवर प्रवेश झाले आहेत.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. यंदा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या आणि रिक्त जागांसाठीच्या तीन फेऱ्या अशा एकूण सहा फेऱ्यांमधून प्रवेश पूर्ण करण्यात आले. यापूर्वी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या आणि रिक्त जागांसाठी एक फेरी झाल्यानंतरही शिल्लक राहिलेल्या जागा संस्थास्तरावर भरल्या जात होत्या. मात्र, यंदा शासनाने प्रवेश नियमांत बदल केल्यामुळे सर्व फेऱ्यांमधील प्रवेश सीईटी कक्षामार्फतच करण्यात आले.

राज्यातील ७० वैद्यकीय महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये एमबीबीएसच्या एकूण ८ हजार ८१४ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ८ हजार ७३० जागांवर प्रवेश झाले असून, ८४ जागा रिक्त राहिल्या आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील सर्व ५ हजार ६५ जागा भरल्या आहेत. मात्र, २५ खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील ३ हजार २९९ जागांपैकी ३ हजार २६० जागांवर प्रवेश झाले असून, ३९ जागा रिक्त आहेत. दोन खासगी वैद्यकीय विद्यापीठांमधील ४५० जागांपैकी ४०५ जागा भरल्या असून, ४५ जागा रिक्त राहिल्या आहेत.

दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या बीडीएससाठी राज्यात २९ महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये एकूण २ हजार ६१७ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी २ हजार ५६३ जागांवर प्रवेश झाले असून, ५४ जागा रिक्त राहिल्या आहेत. पाच शासकीय महाविद्यालयांतील ३१७ जागांपैकी ३१५ जागा भरल्या असून, दोन जागा रिक्त आहेत. २३ खासगी महाविद्यालयांतील २ हजार २०० जागांपैकी २ हजार १७८ जागांवर प्रवेश झाले असून, २२ जागा रिक्त आहेत. एका खासगी वैद्यकीय विद्यापीठातील १०० जागांपैकी ७० जागा भरल्या असून, ३० जागा रिक्त राहिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT