मुंबई : राज्यातील रक्तपेढ्यांमधील रक्तसाठा व्यवस्थापन अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने धडक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने १७ ते १९ जुलैदरम्यान मुंबई शहर व उपनगरांसह पुणे, सोलापूर आणि नाशिकमधील सर्व रक्तकेंद्रांची अचानक तपासणी करण्यात आली. ही मोहीम पुढेही नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या अलीकडील तपासणीत काही रक्तकेंद्रांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्यानंतर राज्य रक्त संक्रमण परिषदेने २७ जून रोजी विशेष तपासणीचे आदेश दिले होते. औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, १९४० नुसार रक्ताला 'औषध' म्हणून मान्यता असल्याने त्याचे संकलन, प्रक्रिया, साठवणूक आणि वितरणात गुणवत्तेचे निकष काटेकोरपणे पाळणे बंधनकारक आहे.
तपासणीसाठी दोन वैद्यकीय अधिकारी आणि वित्त विभाग अथवा राष्ट्रीय आरोग्य अभियानातील एका अधिकाऱ्याचा समावेश असलेली तीन सदस्यीय पथके नियुक्त करण्यात आली आहेत. रक्त संकलन, रक्तघटकांचे व्यवस्थापन, इतर राज्यांत होणारे हस्तांतरण, प्लाझ्मा फ्रॅक्शनेटर्सना पुरवठा, ई-रक्तकोष प्रणालीवरील नोंदी, रक्त व रक्तघटकांच्या प्रक्रिया शुल्काची माहिती, तांत्रिक मनुष्यबळ, रक्तसाठ्याचे अंकेक्षण, रक्तपिशव्यांचा वापर तसेच तक्रारींचे निवारण आदी बाबींची सखोल छाननी करण्यात येत आहे.
तपासणीनंतरचा अहवाल राज्य रक्त संक्रमण परिषद आणि अन्न व औषध प्रशासनाकडे सादर करण्यात येणार आहे. ज्या रक्तकेंद्रांमध्ये नियमभंग, अनियमितता किंवा गंभीर त्रुटी आढळतील त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई केली जाणार असल्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. या मोहिमेमुळे राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये शिस्त, पारदर्शकता आणि गुणवत्तेला अधिक बळ मिळणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.