ITI Admission Pudhari
मुंबई

ITI Admission: राज्यातील आयटीआय प्रवेश प्रक्रियेला 21 मेपासून सुरूवात

1 लाख 57 हजार जागांवर होणार प्रवेश; 1 जूनपासून पसंतिक्रम भरता येणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) ऑगस्ट 2026 सत्राच्या प्रवेश प्रक्रियेला अखेर सुरुवात होत असून, 21 मेपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाल्याने त्याची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 1 जूनपासून विद्यार्थ्यांना व्यवसाय व संस्थानिहाय पसंतीक्रम भरता येणार आहेत.

दैनिक पुढारीने आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक कधी? ही बातमी प्रसिद्ध केल्यानतंरअखेर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करत 21 मेपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार असल्याची प्रवेश सूचना जाहीर केली.

यंदा राज्यातील 418 शासकीय आणि 586 खासगी अशा एकूण 1 हजार 4 आयटीआय संस्थांमध्ये 1 लाख 57 हजार 664 जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक 25 हजार 140 जागा ‌‘इलेक्ट्रिशियन‌’ या ट्रेडसाठी आहेत.

त्याखालोखाल ‌‘फिटर‌’ ट्रेडमध्ये 23 हजार 420, ‌‘वेल्डर‌’मध्ये 17 हजार 340, ‌‘कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट ‌’ मध्ये 10 हजार 824 तर ‌‘मेकॅनिक डिझेल‌’मध्ये 8 हजार 64 जागा उपलब्ध आहेत. यंदाची प्रवेश प्रक्रिया केंद्रीकृत ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांना admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरता येणार आहेत.

अर्ज भरणे, शुल्क भरणे, कागदपत्र पडताळणी आणि प्रवेश निश्चितीची संपूर्ण सुविधा याच पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 150 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये, राज्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी 300 रुपये तर अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांसाठी 500 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT