अदिती कदम
मुंबई: बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि वाढता ताण यामुळे हृदयविकाराचा धोका वाढत आहे. गंभीर हृदयरुग्णांसाठी अखेरचा पर्याय ठरणाऱ्या हृदय प्रत्यारोपणासाठी राज्यात अद्याप १३३ रुग्ण प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, मृत्यूनंतर हृदयदानातून गेल्या अडीच वर्षांत ६६ रुग्णांवर हृदय प्रत्यारोपण करण्यात आले आहे.
प्रादेशिक राज्य अवयव व ऊतक प्रत्यारोपण संस्था (रोटो-सोट्टो) पश्चिम विभागाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, जानेवारी २०२४ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्यात ७६ मृत हृदयांचे संकलन करण्यात आले.
त्यापैकी ६६ हृदयांचे प्रत्यारोपण झाले. २०२४ मध्ये २५ हृदयांचे संकलन करून २१ प्रत्यारोपणे झाली. २०२५ मध्ये २६ हृदयांचे संकलन झाले, तर २२ रुग्णांवर प्रत्यारोपण करण्यात आले. यंदा जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांतच २५ हृदयांचे संकलन झाले असून, त्यापैकी २३ हृदयांचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे.
३१ ऑगस्ट २०२६ अखेर राज्यात १३३ रुग्ण हृदय प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. २०२४ च्या अखेरीस ही संख्या १३७ होती, तर २०२५ अखेरीस ती १२० वर आली होती. यंदा ऑगस्टअखेर पुन्हा १३३ रुग्ण प्रतीक्षा यादीत असल्याचे आकडेवारीतून दिसून येते.
ही प्रतीक्षा यादी म्हणजे केवळ हृदयविकार असलेल्या सर्व रुग्णांची संख्या नाही, तर प्रत्यारोपणासाठी रुग्णालयात नोंद असलेल्या आणि आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण केलेल्या रुग्णांचा यात समावेश होतो. योग्य रक्तगट, शरीराची जुळवणी आणि वैद्यकीय निकषांनुसार दाता मिळाल्यानंतर प्रत्यारोपण केले जाते.
२०१८ नंतरच्या प्रत्यारोपणावर कोरोनाचा परिणाम
उपलब्ध माहितीनुसार, २०१८ मध्ये राज्यात ३४ हृदय प्रत्यारोपणे झाली होती. २०१९ मध्ये ही संख्या ३८ वर पोहोचली. मात्र, २०२० मध्ये कोरोनाच्या काळात ती १४ वर घसरली. त्यानंतर प्रत्यारोपणाच्या संख्येत पुन्हा वाढ झाली. २०२२ मध्ये ३० आणि २०२३ मध्ये ३३ हृदय प्रत्यारोपणे झाली.
योग्य दाता महत्त्वाचा
हृदयविकार टाळण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार, तंबाखू व धूम्रपानापासून दूर राहणे, वजन नियंत्रणात ठेवणे तसेच रक्तदाब आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. मात्र, गंभीर हृदयरुग्णांसाठी प्रत्यारोपणाची गरज निर्माण झाल्यानंतर योग्य दाता मिळणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
आठ महिन्यांत २३ रुग्णांना नवजीवन
२०२६ मध्ये अवघ्या आठ महिन्यांत २५ मृत हृदयांचे संकलन झाले. त्यापैकी २३ हृदयांचे प्रत्यारोपण करण्यात आले. म्हणजेच यंदा आतापर्यंत दर महिन्याला सरासरी तीन रुग्णांपेक्षा अधिक जणांना हृदय प्रत्यारोपणाचा लाभ मिळाला आहे. मात्र, त्याचवेळी १३३ रुग्ण प्रतीक्षेत असल्याने हृदयदानाची गरज कायम असल्याचे चित्र आहे.