

मुंबई: चित्रपटनिर्मिती क्षेत्रातील कथित आर्थिक अनियमितता आणि परदेशातील आर्थिक व्यवहारांच्या संशयावरून आयकर विभागाने सोमवारी मुंबईतील सुमारे १२ ठिकाणी एकाच वेळी झडती घेतली.
पॅनोरमा स्टुडिओज तसेच निर्माते कुमार मंगत पाठक आणि वासू भगनानी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.
याशिवाय, अभिनेत्री रकुलप्रीत सिंह आणि दिग्दर्शक-निर्माते अली अब्बास जफर यांच्याशी संबंधित ठिकाणांचाही तपासात समावेश असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
आयकर विभागाच्या स्वतंत्र पथकांनी मुंबईतील विविध कार्यालये आणि संबंधित परिसरात ही कारवाई केली.
परदेशी व्यवहारांवर विशेष लक्ष
आयकर विभागाला काही संशयास्पद आर्थिक व्यवहारांबाबत माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. चित्रपटांच्या परदेशातील चित्रीकरणाचा खर्च, परदेशी वितरण आणि निर्मिती खर्चाच्या नावाखाली निधी पाठवण्यात आला का, तसेच त्या रकमांचा प्रत्यक्ष वापर संबंधित कामासाठीच झाला का, याची पडताळणी केली जात आहे.
या व्यवहारांमध्ये करनियमांचे उल्लंघन झाले आहे का किंवा उत्पन्न लपवून करचुकवेगिरी करण्यात आली आहे का, याचाही तपास सुरू असल्याचे सांगण्यात येते.
पॅनोरमा, भगनानींच्या कंपन्यांशी संबंध
कुमार मंगत पाठक यांच्या नेतृत्वाखालील पॅनोरमा स्टुडिओजचा चित्रपटनिर्मिती आणि वितरण क्षेत्रात मोठा सहभाग आहे. दुसरीकडे, वासू भगनानी हे पूजा एंटरटेनमेंटशी संबंधित आहेत. संबंधित कंपन्या आणि व्यक्तींच्या चित्रपट प्रकल्पांशी निगडित आर्थिक व्यवहारांची कागदपत्रेतपासली जात आहेत.