आरोग्य योजनांच्या एकत्रीकरणासाठी ‌‘वॉररूम‌’ pudhari photo
मुंबई

Health war room : आरोग्य योजनांच्या एकत्रीकरणासाठी ‌‘वॉररूम‌’

गरजूंना मोफत उपचार; निधीचा अपव्यय टळणार : सर्व योजना एकाच छताखाली

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील विविध आरोग्य योजनांचा समन्वय साधण्यासाठी, दुहेरी लाभ टाळण्यासाठी आणि सर्व आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी एकाच छताखाली प्रभावीपणे करण्यासाठी ‌‘वॉर रूम‌’ स्थापन करण्यात येत आहे. ही वॉर रूम मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या देखरेखीखाली कार्य करणार असून, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली हा कक्ष स्थापन केला जाणार आहे.

राज्यातील विविध आरोग्य योजनांचे सुसूत्रीकरण, पारदर्शकता आणि तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी वॉररूम तयार करण्यात येणार आहे. आरोग्य योजनेत काही वेळा एकाच रुग्णाने दोन किंवा अधिक योजनांचा लाभ घेतल्याची नोंद झाल्याने शासकीय निधीचा अपव्यय टाळण्यासाठी आणि योजनांची समन्वित अंमलबजावणी करण्यासाठी ही वॉररूम स्थापन करण्यात येणार आहे.

नागरिकांना राज्य व केंद्र शासनाच्या सर्व आरोग्य योजनांविषयी माहिती तसेच सर्व अर्ज, शंका व तक्रारींचे निवारण या वॉररूमच्या माध्यमातून केले जाणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी, जलद आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्यासाठी, तसेच दुहेरी लाभ आणि अपात्र प्रकरणे टाळण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालयात उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

या 12 सदस्यीय समितीच्या अध्यक्षस्थानी प्रवीण परदेशी असतील, तर सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महिला व बालविकास, कामगार, आदिवासी विकास, अल्पसंख्याक विकास, दिव्यांग कल्याण आणि विधी व न्याय विभागाचे अधिकारी तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख हे सदस्य म्हणून नियुक्त आहेत.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या सर्वच आरोग्य योजनांचे एकत्रीकरण आणि पारदर्शकतेतून गरजू रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार देण्यासाठी नियमित प्रयत्न सुरू आहेत. त्यातूनच या ‌‘वॉररूम‌’ची स्थापना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाला त्याच्या पात्रतेनुसार योग्य योजनेचा लाभ मिळावा आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत निधी पोहोचावा, यासाठी हा उपक्रम निश्चितच उपयोगी ठरणार आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT