

मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमीत कार्बन फ्री प्रणाली बसवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या पंधरा दिवसात कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवाजी पार्क व आजूबाजूचा परिसर प्रदूषणमुक्त होणार आहे.
या स्मशानभूमीत पारंपरिक चितेवर अंत्यसंस्कार होत असल्याने मोठ्या प्रमाणात धूर पसरतो. उग्रवास व प्रदूषणामुळे येथील नागरिकांना आरोग्याच्या समस्या जानवत असल्याने पालिकेकडे शेकडो तक्रारी आल्याने वायु प्रदूषण नियंत्रण प्रणाली बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
या धुरामुळे चैत्यभूमी स्तूपावर काळे डाग पडत असल्याची तक्रारीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती यांच्याकडून करण्यात आली होती. त्यामुळे चिमणीची उंची वाढविण्याचे निर्देश मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी दिले आहे.
येथे आठ पारंपरिक चिता, दोन विद्युत दाहिनी आणि 1 पीएनजी दाहिनी उपलब्ध आहे. सध्या पारंपरिक चिता, विद्युत दाहिनी व पीएनजी दाहिनीकरिता वायू प्रदूषण नियंत्रण प्रणाली (वॉटर स्क्रबर सिस्टिम) आणि 30 मीटर उंचीची चिमणी स्वतंत्रपणे बसविली आहे. तरीही प्रदूषणामध्ये फारसी घट झालेली नाही त्यामुळे ही प्रणाली बसवण्यात येत आहे.
फायदे काय ?
उच्च कार्यक्षमता फिल्टरेशन (शुद्धीकरण) हवेच्या प्रदूषकातील पीएम 2.5 आणि पीएम 10 यांचे 99.9 टक्के इतके प्रमाण काढून टाकते.
प्रगत गॅस न्यूट्रलायझेशन घातक वायू कमी करते कमी बॅकप्रेशरमुळे अखंडीत कार्यान्वित राहते.
परिरक्षणासाठी यंत्रणा बंद ठेवण्याची आवश्यकता नाही.