India Shop Pudhari
मुंबई

Grocery Prices: जीवनावश्यक किराणा मालाचे दर भडकले; गेल्या नऊ महिन्यांत तब्बल ३५ टक्क्यांनी महाग, मूगडाळ ९२ वरुन १३५ रुपयांवर

Mumbai APMC Rates: इराण युद्ध, पावसाची ओढ, इंधन दरवाढीने भडकली महागाई; दिवाळीनंतर डाळी आणखी कडाडणार

पुढारी वृत्तसेवा

why are groceries so expensive nowadays

नवी मुंबई : राजेंद्र पाटील

यावर्षी १ जानेवारी ते ८ सप्टेंबर या नऊ महिन्यांत तूर, मूग, उडीद, वाटाणा, चणाडाळ, मसुरडाळींसह ज्वारी, बाजारी आणि गहू आदी किराणा वस्तूंच्या दरात मुंबई एपीएमसीसह राज्यातील घाऊक बाजारपेठांमध्ये तब्बल ३५ टक्क्यांची दरवाढ झाली आहे.

इराण-अमेरिका युध्दामुळे सागरी मार्गाने होणारी आयात एप्रिल ते जून अखेरपर्यंत ठप्प होती. ‍त्‍यात परराज्ये आणि महाराष्ट्रातील डाळींसह गहू, ज्वारी, बाजारी, मका पिकाचे उत्पादन घेणाऱ्या जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. असा दुहेरी फटका बसला आणि त्‍यात इंधन दरवाढीचेही चटके बसल्याने जीवनावश्यक किराणा मालाचे दर भडकले, असे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.

गेल्या नऊ महिन्यांत सोलापुरात ज्वारी १५ टक्क्यांनी महाग झाली आहे.क्रॉस आणि लोकवन गहू सरासरी ५ ते १० टक्क्यांनी महागला आहे. तूरडाळ ७८ रुपयांवरुन ११८ रुपये तर उडीद डाळ ९५ रुपयांवरुन ११८रु. किलोपर्यंत पोहोचली आहे. मूगडाळ ९२ रुपयांवरुन १३५ रुपये किलोपर्यंत गेली आहे. ही दरवाढ नऊ महिन्यांतील आहे.

तूर डाळीचे उत्पादन घेणाऱ्या मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यांत, तर चणाडाळीचे अकोला जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणावर उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. मसूर डाळ मध्यप्रदेशातून येते. उत्पादन कमी झाल्यास दरवर्षी तूर डाळ कॅनडा आणि रशियामधून आयात केली जाते. ज्वारी, बाजारी आणि गहू पिकांनाही पावसाचा फटका बसला आहे.

डाळी आणखी महागणार

सध्या परदेशातून डाळींची आयात सुरु असली तरी डाळींचे दर स्थिर राहण्याची शक्यता कमी आहे. महाराष्ट्रातील डाळी उत्पादन जिल्ह्यांतही सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची दाट शक्यता आहे. दोन महिन्यानंतर आणखी डाळींसह इतर जीवनाश्यक वस्तूंच्या दरात ५ ते १० टक्के दरवाढ होईल, अशी माहिती घाऊक व्यापारी निलेश विरा यांनी दिली.

जीएसटीचाही दणका

केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंवर म्हणजे पॅकिंग केलेल्या अनब्रँडेड अन्नधान्य, डाळींवरही पाच टक्के जीएसटी लागू केल्याने अन्नधान्य आणि डाळींच्या दरवाढीत ८ ते १२ टक्क्यांनी भर पडली आहे.

मुंबई एपीएमसीतील धान्य आणि मसाला बाजारपेठेतील १२५० घाऊक व्यापारी आहेत. या व्यापाऱ्यांकडे गहू, ज्वारी, तांदूळ आणि डाळींच्या ३० ते ४० किलोच्या पॅकिंग बॅग येतात. त्यावर पाच टक्के जीएसटी लागू होतो. यामुळे आता किरकोळ खरेदीदारांनी २५ ते ३० किलोच्या पॅकिंग बॅग खरेदी करण्यावर भर दिला आहे. त्यावर जीएसटी लागू होत नाही. किरकोळ व्यापारी घाऊक बाजारातील खरेदी केलेला माल हा किराणा दुकानात खुल्या पद्धतीने विक्री करतो. त्यामुळे ग्राहकांची पाच टक्के जीएसटी बचत होत असली तरी किलोमागे १५ ते २५ रुपयांचा भुर्दंड मात्र सोसावाच लागतो आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT