Retired Police Dogs Devendra Fadnavis Pudhari
मुंबई

Retired Police Dogs: 10 वर्षे पोलीस दलाची निष्ठेने सेवा, आता निवृत्तीनंतरही साथ कायम; श्वानांसाठी CM फडणवीसांचा मोठा निर्णय

Retired Police Dogs Maharashtra: पोलीस दलात तब्बल 10 वर्षे सेवा बजावल्यानंतर निवृत्त होणाऱ्या श्वानांसाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Retired Police Dogs Maharashtra: पोलीस दलात अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या श्वानांबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. तब्बल 10 वर्षे पोलीस दलात सेवा बजावल्यानंतर निवृत्त होणाऱ्या श्वानांना आता त्यांच्या उर्वरित आयुष्यातही पोलिसांपासून दूर जावे लागणार नाही. निवृत्तीनंतरही या श्वानांचा सांभाळ पोलीस विभागातच केला जाणार असून, त्यांच्या जेवनासह देखभालीचा खर्च गृहविभाग उचलणार आहे.

पोलीस श्वान हे पोलीस दलाचा महत्त्वाचा भाग असतात. गुन्हे उघडकीस आणणे, बॉम्ब आणि स्फोटकांचा शोध घेणे, अमली पदार्थ शोधणे, हरवलेल्या व्यक्तींचा माग काढणे अशा अनेक जबाबदाऱ्या ही श्वाने पार पाडतात. आपल्या सेवाकाळात ते प्रशिक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांसोबत दिवसाचे अनेक तास घालवतात. त्यामुळे त्यांच्यात केवळ कामाचे नाते राहत नाही, तर एकमेकांशी जिव्हाळ्याचे आणि विश्वासाचे नाते निर्माण होते.

मात्र, आतापर्यंत 10 वर्षांचा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर या श्वानांना निवृत्त केले जात होते आणि त्यानंतर अनेकदा त्यांना दत्तक देण्यात येत होते. अचानक आपला प्रशिक्षक आणि परिचित जागा बदलल्यामुळे काही श्वानांना या बदलाशी जुळवून घेणे कठीण जात होते. त्यामुळे त्यांच्या मानसिक स्थितीवरही परिणाम होत असल्याचे समोर आले होते. काही प्रकरणांमध्ये श्वानांनी अन्न खाणेही कमी केले होते.

ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवृत्त पोलीस श्वानांच्या भवितव्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस दलासाठी आयुष्यातील तब्बल 10 वर्षे सेवा दिल्यानंतर या श्वानांना निवृत्तीनंतर चांगले आयुष्य जगता यावे, अशी भूमिका सरकारने घेतली आहे.

या निर्णयानुसार निवृत्तीनंतरही पोलीस श्वान पोलीस विभागातच राहतील. त्यामुळे त्यांना आपल्या परिचित वातावरणात राहता येईल. तसेच त्यांच्या खाण्यापिण्याचा तसेच इतर आवश्यक देखभालीचा संपूर्ण खर्च गृहविभागाकडून केला जाणार आहे.

पोलीस श्वानांना केवळ प्राणी म्हणून न पाहता, अनेक वर्षे निष्ठेने सेवा देणारा दलाचा एक महत्त्वाचा सदस्य म्हणून त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. निवृत्तीनंतरही त्यांच्या सुरक्षित आणि सुखकर आयुष्याची जबाबदारी सरकारने स्वीकारल्याने या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

10 वर्षे कर्तव्य बजावल्यानंतर निवृत्त होणाऱ्या या मुक्या सहकाऱ्यांची साथ आता तुटणार नाही. पोलीस दलासाठी निष्ठेने सेवा करणाऱ्या श्वानांना त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धातही सन्मानाने आणि आपुलकीने जगता यावे, यासाठी घेतलेला हा निर्णय संवेदनशील मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT