

विरार : चेतन इंगळे
वसई-विरार शहरात भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव आता नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न बनला आहे. महापालिकेच्या उपलब्ध आकडेवारीनुसार जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ या अवघ्या दोन महिन्यांत तब्बल १० हजार १२० नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. म्हणजेच या दोन महिन्यांत दररोज सरासरी १६६ श्वानदंशाच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. वर्षाच्या सुरुवातीलाच एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक श्वानदंशाचे बळी ठरत असल्याने भटक्या श्वानांवरील नियंत्रणाच्या उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
वसई-विरारमधील श्वानदंशाच्या घटनांचा मागील काही वर्षांचा आलेख पाहिल्यास परिस्थितीची गंभीरता आणखी स्पष्ट होते. २०२० मध्ये ११ हजार ६३०, २०२१ मध्ये ११ हजार ५०८, २०२२ मध्ये १७ हजार ६७४, २०२३ मध्ये ३० हजार २४३, २०२४ मध्ये ३६ हजार ६७७ आणि २०२५ मध्ये तब्बल ४६ हजार ३५४ श्वानदंशाच्या घटना नोंदल्या गेल्या. २०२० ते २०२५ या सहा वर्षांच्या कालावधीत श्वानदंशाच्या घटनांमध्ये तब्बल ३४ हजार ७२४ने वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
विशेष म्हणजे २०२०च्या तुलनेत २०२५ मधील घटनांची संख्या जवळपास चौपट होण्याच्या दिशेने गेली आहे. २०२५ मध्ये नोंदलेल्या ४६ हजार ३५४ श्वानदंशाच्या घटनांचा विचार केला तर वर्षभरात दररोज सरासरी सुमारे १२७ नागरिकांना श्वानांनी चावा घेतला. मात्र २०२६च्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ही दैनिक सरासरी वाढून १६६ वर पोहोचली आहे. म्हणजेच मागील वर्षाच्या संपूर्ण वर्षातील दैनिक सरासरीपेक्षा यंदाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांमध्ये दररोज होणाऱ्या श्वानदंशाच्या घटनांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे पुढील काळात ही समस्या आणखी गंभीर होऊ नये यासाठी महापालिकेने तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.
शहरातील विविध भागांत भटक्या श्वांनाच्या टोळ्या मोठ्या संख्येने फिरताना दिसत असून, रस्ते, बाजारपेठा, गृहनिर्माण सोसायट्यांचे परिसर, शाळांच्या आसपास तसेच कचरा संकलनाच्या ठिकाणी त्यांचा वावर वाढला आहे. सकाळी कामानिमित्त बाहेर पडणारे नागरिक, रात्री उशिरा घरी परतणारे कामगार, पादचारी आणि दुचाकीस्वार यांना श्वानांच्या हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. श्वानदंशाचा धोका केवळ जखमेपुरता मर्यादित नसून त्यातून रेबीजसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका निर्माण होतो.
नालासोपारा येथे नऊ वर्षीय मुलीचा रेबीजमुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर या प्रश्नाचे गांभीर्य आणखी वाढले. श्वानाचा चावा किंवा ओरखडा किरकोळ असल्याचे समजून त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे श्वानदंश झाल्यानंतर जखम तातडीने स्वच्छ करणे, वैद्यकीय सल्ला घेणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रेबीज प्रतिबंधक लसीकरणाचा पूर्ण उपचारक्रम घेणे अत्यावश्यक आहे. भटक्या श्वानांची संख्या नियंत्रित करण्यासाठी निर्बीजीकरण आणि रेबीजविरोधी लसीकरण ही महत्त्वाची साधने आहेत. महापालिकेकडून या उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी श्वानदंशाच्या घटनांचा वाढता आलेख पाहता मोहिमेचा वेग आणि व्याप्ती वाढविण्याची गरज आहे. शहरातील कचरा व्यवस्थापनाचाही या समस्येशी संबंध आहे.
परिणामी अशा ठिकाणी श्वानांचे टोळक्या जमा होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे निर्बीजीकरण आणि लसीकरणाबरोबरच कचरा उघड्यावर पडणार नाही, याची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. २०२० मधील ११ हजार ६३० घटनांपासून २०२५ मधील ४६ हजार ३५४ घटनांपर्यंत झालेली ३४ हजार ७२४ घटनांची वाढ प्रशासनासाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे.
त्यातच २०२६च्या पहिल्या दोन महिन्यांत १० हजार १२० घटना नोंदल्या गेल्याने यंदाच्या सुरुवातीपासूनच परिस्थिती चिंताजनक असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेने आता श्वानदंशाच्या घटनांकडे केवळ आरोग्य विभागाचा प्रश्न म्हणून न पाहता त्यासाठी बहुआयामी कृती आराखडा तयार करण्याची गरज आहे.
आकडेवारीचा वाढता आलेख धक्कादायक
वसई-विरारमधील आकडेवारीचा हा वाढता आलेख प्रशासनासाठी निश्चितच चिंतेचा विषय आहे. २०२० — ११ हजार ६३०, २०२१ — ११ हजार ५०८, २०२२ — १७ हजार ६७४, २०२३ — ३० हजार २४३, २०२४ — ३६ हजार ६७७, २०२५ — ४६ हजार ३५४ आणि जानेवारी-फेब्रुवारी २०२६ — १० हजार १२० अशी श्वानदंशाची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीविताशी निगडित या प्रश्नावर महापालिका प्रशासनाने आता अधिक प्रभावी, सातत्यपूर्ण आणि परिणामकारक कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.