मुंबई: गणेशोत्सव तसेच आगामी नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने विविध जिल्ह्यांत अन्न भेसळ आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. या कारवाईत द्रवरूप दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मिठाईसह ४ हजार १३८.७ किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत १५ लाख ५८ हजार ७२ रुपये आहे.
दरम्यान, जालना आणि बीड जिल्ह्यांत प्रतिबंधित गुटख्याविरोधात केलेल्या कारवाईत तब्बल १ कोटी ४५ लाख ९४ हजार ६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जालन्यात सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील राजूर येथे एफडीए आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत ९५ लाख ३० हजार ४६४ रुपये किमतीचा गुटखा व इतर प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त केला. या मालाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली सुमारे ४० लाख रुपये किमतीची वाहनेही जप्त करण्यात आली.
या कारवाईत एकूण १ कोटी ३५ लाख ३० हजार ४६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. संबंधितांविरुद्ध हसनाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीडमध्ये स्कॉर्पिओमधून गुटखा
बीड शहरात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या महिंद्रा स्कॉर्पिओवर कारवाई करण्यात आली. वाहनातून ३ लाख ६३ हजार ६०० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला.
जळगावमध्ये २१५५ किलो हलवा
जळगाव जिल्ह्यात दोन वाहतूक वाहनांमधून सुमारे २ हजार १५५ किलो संशयित भेसळयुक्त स्वीट हलवा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत सुमारे ५ लाख ५८ हजार रुपये आहे.
याशिवाय जळगाव येथील बृजविलास डेअरीमधून २८ किलो खवा, रावेर येथील एकता दूध डेअरी अँड स्वीट्समधून पेढा आणि म्हशीचे तूप, तर चाळीसगाव येथील ताराचंद सुंदरजी अँड सन्समधून पेढा जप्त करण्यात आला. श्रीखंड अस्वच्छ पद्धतीने साठवून ठेवल्याचेही एका कारवाईत आढळून आले.
कोल्हापुरात हलवा, रबडी संशयित
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील ताकवडे येथील शिवरत्न मिल्क अँड मिल्क अॅग्रो प्रॉडक्टची तपासणी करण्यात आली. येथे १० किलो हलवा आणि १९८ किलो रबडी, असा एकूण २०८ किलो साठा आढळून आला.
पुणे जिल्ह्यातही कारवाई
दौंड तालुक्यातील पाटस येथील क्रीमी डिलाइट येथे तपासणीदरम्यान १ हजार ५१९ किलो दूध, बटर आणि स्किम्ड मिल्क पावडर आढळून आले.
या साठ्याची किंमत सुमारे ८ लाख ५० हजार ७०२ रुपये आहे. या पदार्थांच्या लेबलिंगमध्ये त्रुटी आढळून आल्या असून, दर्जाबाबतही संशय व्यक्त करण्यात आला आहे.
मंचर येथील महावीर डेअरीमधून ४९ किलो खवा, १०४ किलो पनीर आणि ११ किलो तूप, असा एकूण १६४ किलो साठा जप्त करण्यात आला.
ठाण्यात सुट्या दुधाच्या विक्रीवर कारवाई
बदलापूर येथील भैरवनाथ डेअरीमध्ये तपासणीदरम्यान ३० लिटर पाश्चराइज्ड स्टँडर्डाइज्ड म्हशीचे दूध सैल स्वरूपात विकले जात असल्याचे आढळून आले. या दुधाची किंमत २ हजार ८३० रुपये आहे. स्टँडर्डाइज्ड दुधाची सुट्या स्वरूपात विक्री करण्यास बंदी असतानाही विक्री केल्याने संबंधितांवर कारवाई करण्यात आली.