मुंबई: राज्यातील कोणतीही मासेमारी नौका १५ ऑगस्टपर्यंत मासेमारी बंद ठेवावी आणि मत्स्यव्यवसाय उपायुक्त महेश देवरे यांच्या कार्यपद्धतीची उच्चस्तरीय चौकशी करावी,अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना ई-मेलवरून निवेदन देण्यात आले आहे. तर गुरुवारी मंत्री नितेश राणे यांच्यासमवेत सुवर्णगड या त्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी बैठक झाली.
याबाबत कृती समिती अध्यक्ष देवेंद्र तांडेल म्हणाले, राज्यसरकारने १ जून ते १५ ऑगस्ट २०२६ समुद्रात मासेमारी करण्यासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. तसेच या निर्णयाची राज्यभर कठोर अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रशासकीय आदेश तात्काळ निर्गमित करण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय उपायुक्त महेश देवरे यांना दिल्या होत्या.
मात्र;त्यानंतर मत्स्यव्यवसाय विभागामार्फत प्रसिद्ध केलेल्या सूचनांमध्ये प्रवेश पत्र असलेल्या नौकांना १२ सागरी मैलांच्या पलीकडील विशेष आर्थिक क्षेत्रात मासेमारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.ही परवानगी देण्यात आल्याने राज्यातील लाखो पारंपरिक मच्छिमारांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
नितेश राणे यांच्या बैठकी समवेत मिल्टन सौंदिया, प्रफुल भोईर, चंद्रकांत तरे यांच्यासह मच्छीमार बांधव उपस्थित होते. यावेळी मच्छीमारांच्या भावना मंत्री राणे यांनी समजून घेतल्या. गुजरात मधील मत्स्यव्यवसाय विभागाशी चर्चा करून १५ ऑगस्टपर्यंत संपूर्ण मासेमारी बंदी कायम ठेवण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली होती.
मच्छीमारांना न्याय द्यावा
महाराष्ट्रात उपायुक्त हरवले आहेत, त्यांना शोधा असे राज्यव्यापी लोकजागृती अभियान शुक्रवारी राबविण्यात आले.याचा उद्देश कोणत्याही व्यक्तीची बदनामी करणे नसून मत्स्यव्यवसाय विभागाने पारंपरिक मच्छीमारांचा आवाज ऐकावा,शासनाच्या निर्णयांची प्रामाणिक अंमलबजावणी करावी व मच्छिमारांना न्याय मिळावा हा असल्याचे तांडेल म्हणाले.