Mumbai FDA Action pudhari photo
मुंबई

Maharashtra FDA Action: महाराष्ट्रात FDA ची मोठी कारवाई! १८.८३ लाखांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त

मुंबई, पुणे, कोकण आणि नागपूर विभागांत १८.८३ लाखांचा साठा आणि दोन वाहने जप्त; चार आस्थापने सील

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, साठवणूक आणि वाहतूक रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवली आहे. १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी मुंबई, पुणे, कोकण आणि नागपूर विभागांत केलेल्या कारवाईत १८ लाख ८३ हजार ३७८ रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आणि दोन वाहने जप्त करण्यात आली.

या प्रकरणांत १० एफआयआर दाखल करून १० आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. चार आस्थापने सील करण्यात आली आहेत.

मुंबई विभागात दोन स्वतंत्र कारवायांमध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आणि वाहने जप्त करण्यात आली. १५ ऑक्टोबर रोजी परिमंडळ-५ मधील अन्न सुरक्षा अधिकारी गौरी जोशी यांनी टाटा पिकअप वाहनातून सात लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त केला. या वाहनाची अंदाजित किंमत तीन लाख रुपये आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

परिमंडळ-१२ मध्ये अन्न सुरक्षा अधिकारी तुषार शेळके यांनी गुन्हे शाखा युनिट-१२ च्या मदतीने महिंद्रा बोलेरो पिकअपमधून चार लाख ४४ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त केला. याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही प्रकरणांत प्रत्येकी एका आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

पुणे विभागात सहा आस्थापनांच्या तपासणीत पाच लाख १५ हजार १९९ रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. सहा एफआयआर दाखल करून सहा व्यक्तींना अटक करण्यात आली, तर तीन आस्थापने सील करण्यात आली. कोकण विभागात दोन लाख तीन हजार १४९ रुपये किमतीचा साठा जप्त करून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आणि एक आस्थापना सील करण्यात आली.

नागपूर विभागात २१ हजार ३० रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात पुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT