Agriculture News Pudhari
मुंबई

Farmers Relief Maharashtra: अतिवृष्टीग्रस्त १७ हजार शेतकऱ्यांना २३ कोटी मंजूर; पुणे, सातारा जिल्ह्यांना ९ कोटी १३ लाख

या मदतीत अमरावती विभागाचा वाटा सर्वाधिक आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: जून-जुलै २०२६ मधील अतिवृष्टी, पूरस्थिती, चक्रीवादळ आणि गारपिटीने नुकसान झालेल्या राज्यातील १७ हजार २४५ शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने २३ कोटी ३३ लाख ३१ हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे.

या मदतीत अमरावती विभागाचा वाटा सर्वाधिक आहे. या विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांतील एकूण ९ हजार ६८३ शेतकऱ्यांसाठी १३ कोटी ८० लाख ७४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

त्यापैकी एकट्या बुलढाणा जिल्ह्यातील ७ हजार ६५८ शेतकरी बाधित असून, त्यांच्या मदतीसाठी ११ कोटी ५९ लाख ९८ हजार रुपये मंजूर झाले आहेत.

पुणे विभागातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील ६ हजार ८८५ शेतकऱ्यांना ९ कोटी १३ लाख २९ हजार रुपये, नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ६६१ शेतकऱ्यांसाठी ३८ लाख ८७ हजार रुपये, तर कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ शेतकऱ्यांसाठी ४१ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.

मदत थेट खात्यात, कर्जवसुलीला मनाई

सदरची मदत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दिली जाणारी ही मदत बँकांनी कर्जाच्या थकबाकीपोटी वळती करू नये, असेही जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

एका हंगामात एकदाच मदत

त्याच हंगामातील पीक नुकसानीसाठी मदत मिळालेल्या निधीत नव्या प्रस्तावातील रक्कम समाविष्ट होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच एका हंगामात निर्धारित दराने एकदाच मदत दिली जाईल आणि कोणत्याही लाभार्थ्याला दुबार मदत मिळणार नाही, याची खातरजमा करण्याच्या सूचना तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT