

मुंबई: तलावामध्ये ९५ टक्के पाणीसाठा झाला असला तरी, ऑगस्ट २०२७ पर्यंत मुंबईकरांना पाणी पुरवण्याचे नियोजन करण्याचे निर्देश राज्याच्या जलसंपदा विभागाने दिले होते. त्यामुळे सध्याचा पाणीसाठा लक्षात घेऊन, शहरात सुरू असलेली दहा टक्के पाणी कपात सुरू ठेवण्यात आल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.
गेल्या १५ मे पासून लागू करण्यात आलेली १० टक्के पाणी कपात मुंबईत सुरू ठेवण्यात आली असून ही कपात मुंबई शहर उपनगरात नसून मुंबई लगतच्या भिवंडी व अन्य महानगरपालिका तसेच ग्रामपंचायतीला देण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्येही कपात करण्यात आली आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये २८ ऑगस्टपर्यंत ९५.५३ टक्के पाणीसाठा आहे.
तो ऑगस्ट २०२७ अखेरपर्यंत पुरवण्यासाठी ३१ ऑगस्ट रोजी सातही तलावातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन, पाणी कपात रद्द करायची की नाही, याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे सध्या तरी पाणी कपात रद्द करण्याचा महापालिकेचा कोणताही विचार नाही.