कृषी मंत्री दत्तात्रय भरणे File Photo
मुंबई

Maharashtra Farmer Loan: 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा

अवकाळी पाऊस व आर्थिक संकटात सापडलेल्या सुमारे 25 लाख शेतकऱ्यांना दिलासा; समिती अहवालानंतर निर्णयाची अंमलबजावणी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ आणि गारपिटीमुळे कर्जाच्या खाईत अडकलेल्या शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफी देण्यात येईल, अशी खूशखबर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी दिली. कर्जमाफीच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेल्या सुमारे 25 लाख शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी 30 जूनचा मूहूर्त यापूर्वीच जाहीर केला आहे. त्याचाच पुनरुच्चार कृषी मंत्री भरणे यांनी शनिवारी केला.

राज्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी अशा आस्मानी संकटाबरोबरच बाजारभावातील चढउतारामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका आणि राष्ट्रीयकृत बँका यांच्याकडून घेतलेली पीककर्जे थकली आहेत.लोकसभा व विधानसभा निवडणूकीदरम्यान महायुतीमधील पक्षांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. पण अजूनही कर्जमाफी झालेली नाही. सत्तेवर येण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.

प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांनीही शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अभ्यास करण्यासाठी आणि ही कर्जमाफी कशापद्धतीने लागू करावी, यासाठी फडणवीस यांनी ‌’मित्र‌’ संस्थेचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती जाहिर केली. समितीच्या शिफारशींच्या आधारे 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली होती.

शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना कृषीमंत्री भरणे यांनी सांगितले की, कर्जमाफीच्या संदर्भात परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळणार आहे. हा अहवाल आल्यानंतर त्यावर मंत्रिमंडळात सारासार विचार करून साधारण 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, कर्जमाफीबाबत अगोदरच निर्णय झाला आहे. ही कर्जमाफी कधी करायची हे देखील शासानाने ठरवले आहे. त्यासंदर्भातील आकडेवारी डेटा गोळा झाला पाहिजे म्हणून सध्या कार्यवाही सुरु आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT