

मुंबई : एसटी महामंडळाच्या राज्यभरातील कर्मचार्यांना वेतनासोबत या महिन्यात वेतनवाढ फरक हप्ता न मिळाल्याने असंतोष पसरला असून राज्य सरकारच्या अर्थ खात्यातील कामगार विरोधी अधिकार्यांमुळे शिमग्या अगोदरच बोंब मारण्याची वेळ कर्मचार्यावर आली. येत्या 24 तारखेला अनोख्या पद्धतीने होणार्या आंदोलनाच्या टीझरचे सादरीकरण कानठळ्या बसतील इतक्या बोंबा मारून एसटी कामगारांनी शनिवारी सरकारला इशारा दिला.
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या वतीने सरचिटणीस श्रीरंग बरगे यांच्या उपस्थितीत एसटी कर्मचार्यांनी दादर येथील टिळक भवन येथे बोंब मारो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर टीझरचे सादरीकरण केले. टीझरच्या माध्यमातून प्रत्यक्ष बोंबा मारून अनोख्या पद्धतीने राज्य सरकारच्या अर्थ खात्यातील कामगार विरोधी अधिकार्यांना हा इशारा देण्यात आला.
या संदर्भातील आंदोलनाची नोटीस परिवहन खात्याचे अप्पर मुख्य सचिव यांच्या मार्फत राज्य सरकारच्या अर्थ खात्यातील अधिकार्यांना देण्यात आली असून 24 फेब्रुवारी रोजी, आझाद मैदान, मुंबई येथे हे आगळे-वेगळे बोंब मारो आंदोलन करण्यात येणार आहे.
वेतनवाढ फरक देण्यासाठी एकूण 192. 32 कोटी रुपये इतका निधी लागणार असून सदरची रक्कम राज्य सरकारच्या अर्थ खात्याने एसटी महामंडळाला द्यावी अन्यथा हे टीझर सादरीकरण खाली झांकी है...पुरा पिक्चर बाकी है... असा गर्भित इशाराही यावेळी कामगारांनी टीझरच्या माध्यमातून व प्रत्यक्ष कानठळ्या बसतील इतक्या बोंबा मारून दिला आहे.