मुंबई: राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ देऊन अद्याप प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे राज्य सचिव अॅड. वैभव थोरात यांनी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्याकडे केली आहे.
राज्यातील अनेक विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शेवटच्या फेरीपर्यंत प्रवेश मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. विशेषतः स्पॉट राऊंड अथवा त्यानंतरच्या प्रवेश फेरीत प्रवेश मिळेल, या अपेक्षेने अनेक विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेत सहभागी होत आहेत.
मात्र, आर्थिक अडचणी, कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी लागलेला वेळ, प्रवेशप्रक्रियेबाबत झालेला विलंब तसेच अन्य अपरिहार्य कारणांमुळे अनेक विद्यार्थी अद्याप प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. याचबरोबर राज्यातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये काही जागा रिक्त असल्याचे थोरात यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी उपलब्ध झाल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यापक हिताचा विचार करून संबंधित विभागाकडे याबाबत सकारात्मक पाठपुरावा करावा, अशी विनंती अॅड. थोरात यांनी उपसभापती सचिन अहिर यांच्याकडे केली आहे. याबाबत सूचना अहिर यांनी सीईटी सेलला दिल्या आहेत.