मुंबई: अर्थव्यवस्थेच्या आकाराचा विचार केल्यास महाराष्ट्राची स्पर्धा आता देशातील अन्य कोणत्याच राज्याशी नाही. महाराष्ट्र सध्या जगातील तिसावी मोठी अर्थव्यवस्था आहे. विकासाची ही गती कायम राखल्यास पुढच्या दोन-तीन वर्षांत संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि सिंगापूरलाही मागे टाकू शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केला.
सह्याद्री अतिथीगृहात राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह पुरस्कार्थी अधिकारी उपस्थित होते. राज्यातील प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी ‘झीरो ब्युरोक्रसी’ची संकल्पना राबविण्याचा निर्धार मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केला.
राज्य सरकारने 100 आणि 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय सुधारणांना गती दिली. विकसित महाराष्ट्र 2047 साठी 2029, 2035 आणि 2047 असे तीन टप्पे निर्धारित करून त्यादिशेने कामांना सुरुवात केली. लोकांना अधिक सुलभपणे, निष्पक्षपणे परिणामकारक सेवा देण्यासाठी प्रशासनात सुधारणा केल्या.
त्यासाठी ‘आपले सरकार’चा दुसरा टप्पाही आता सुरू केला जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या काळात झालेल्या सुधारणा या एखाद्या स्टार्टअपसारख्या झाल्या. प्रशासनातील नावीन्यपूर्ण उपक्रमांकडे एक स्वतंत्र स्टार्टअप म्हणून पाहिल्यास मोठा फायदा होईल. लोकांना एक अतिशय पारदर्शी सरकार देण्याचे आपले उद्दिष्ट नक्की यशस्वी होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
विविध विभागांचा सन्मान
ड्रोन आधारित देखरेख-डिजिटल डेटा मेंटेनन्स प्रणालीसाठी कृषी तसेच पदुम विभागास प्रथम क्रमांकांचा दहा लाखांचा तर कार्यालयीन कामकाजातील सुधारणेसाठी मराठी भाषा विभागाला सहा लाखांचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला.
मत्स्यसंपदेच्या संरक्षण संवर्धन प्रकल्पासाठी मत्स्यव्यवसाय आयुक्त मुंबई यांना प्रथम क्रमांकाचा विभागीय, तर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरासाठी दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला.
विभागीय स्तरावर तळोदा येथील आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी यांना प्रथम क्रमांकाचा, जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दुसऱ्या क्रमांकाचा, तर वाशिम कृषी विकास अधिकारी यांना तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
महापालिका गटात कूल रूफ संकल्पनेसाठी अमरावती, व्हॉट्सॲप व चॅटबॉटद्वारे सेवांसाठी छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन, तर ई-गव्हर्नन्ससाठी मीरा-भाईंदर महापालिकेला अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले आहे.