BJP vs Congress Pudhari
मुंबई

Maharashtra Legislative Council Election: विजयापेक्षा काँग्रेसचे 'नरेटिव्ह' निकाली निघाल्याने भाजपला समाधान

बॅलेटवरही मतदारांनी काँग्रेसला नाकारल्याचा भाजपचा दावा

पुढारी वृत्तसेवा

गौरीशंकर घाळे

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेत पदवीधर - शिक्षक मतदारसंघातून निवडून द्यायच्या पाच जागांसाठीची यंदाची निवडणूक सत्ताधारी आणि विरोधी पक्षांसाठी प्रतिष्ठेची होती. पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपचे कौस्तुभ गावडे विजयी झाले.

तर, नागपूर पदवीधरमध्ये मतमोजणी अद्याप संपलेली नाही. लढविलेल्या तीनपैकी एका जागेवर भाजपचा उमेदवार निवडून आल्याचे सध्याचे चित्र आहे.

त्यामुळे विधान परिषदेतील भाजपचे संख्याबळ एकने वाढणार आहे. मात्र, एका जागेवरील या विजयापेक्षा काँग्रेसचे ईव्हीएम विरोधातील 'नरेटिव्ह' बाद झाल्याचा मुद्दा भाजपने महत्वाचा मानला आहे. बॅलेट पेपरवर झालेल्या लढतीतही काँग्रेस अपयशी ठरली, हा सूर आता भाजपने लावला आहे.

महाराष्ट्राच्या विधान परिषदेत भाजप सध्या सर्वात मोठा पक्ष आहे. पाच जागांच्या निवडणुकीतील निकालाने परिषद सभागृहातील संख्याबळावर तसा कोणताच नाट्यमय परिणाम होणार नव्हता. मात्र, ईव्हीएम विरोधात काँग्रेसने देशभर रान उठवत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी रेटून धरली आहे.

दुसरीकडे जेन-झी आंदोलनामुळे सत्ताधारी भाजप विरोधात सार्वत्रिक असंतोषाची भावना असल्याचा दावाही विरोधी पक्षांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका या भाजपसाठी 'नरेटिव्ह'चा विषय बनला होता. या लढतीत भाजपचा एक उमेदवार निवडून आला आहे.

तर, नागपूर पदवीधरची मतमोजणी अद्याप संपलेली नाही. इथे प्रत्येक फेरीत चित्र बदलत असल्याने भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस आहे. रात्री उशिरा इथे निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अमरावती शिक्षक मतदारसंघात भाजपचा सत्तेतील सहकारी असलेल्या शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे.

बुधवारी रात्रीपर्यंतच्या निकालानुसार तरी महाराष्ट्रात काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. महाराष्ट्राप्रमाणे अन्य राज्यातील परिषद निवडणुकांतही काँग्रेस अपयशी ठरली. त्यामुळे जिंकलेल्या एका जागेपेक्षा काँग्रेसच्या नरेटिव्हचा फुगा फुटला, ही भाजपच्या खात्यातील मोठी भर मानली जात आहे.

ईव्हीएमच्या जोरावर भाजप विजयी होते, बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यास जनता काँग्रेससोबत असल्याचे दिसून येईल, असा तर्क विरोधी पक्षांकडून गेल्या काही काळापासून केला जात होता. ईव्हीएममध्ये छेडछाड शक्य नसल्याचा तज्ज्ञांचा दावा 'नरेटिव्ह'च्या भावनेसमोर तोकडा ठरत होता.

मात्र, विधान परिषदेच्या या निवडणुकांच्या निमित्ताने बॅलेट पेपरवरही जनतेने काँग्रेसला नाकारल्याची बाब आता भाजप ठळकपणे समोर मांडत आहे. विशेषतः जिथे शिक्षक आणि पदवीधर वर्ग मतदार आहे, अशा सुशिक्षित गटाने काँग्रेसच्या नरेटिव्हवर बोळा फिरविला आहे.

त्यामुळे सहा वर्षांपुर्वी झालेल्या निवडणुकीत जिथे भाजपला एकही जागा जिंकता आली नाही तिथे आता एका जागेची कमाई केली. त्यापेक्षा काँग्रेसचा नरेटिव्ह फेल गेला, हा मोठा विजय असल्याची भावना भाजपच्या वर्तुळातुन व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT