महाराष्ट्रातही मणिपूरसारखे काही घडेल, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले 
मुंबई

Sharad Pawar| महाराष्ट्रातही मणिपूरसारखे घडेल : शरद पवार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रातही मणिपूरसारखे काही घडेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोमवारी केले. राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा-ओबीसी आरक्षणाचा वाद आणि त्यामुळे काही ठिकाणी एकमेकांसमोर उभे ठाकलेले हे दोन्ही समाज, असे चित्र असताना पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या या वक्तव्यावर भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

पिढ्यान्पिढ्या एकत्र असलेला मणिपूरसारखा लहानसा प्रांत अस्वस्थ झाला. दोन जमातींमध्ये संघर्ष झाला. घरेदारे पेटवण्यात आली. शेती उद्ध्वस्त करण्यात आली. स्त्रियांवर अत्याचार झाले. पिढ्यान्पिढ्या एकत्र राहणारा, सुसंवाद ठेवणारा समाज आज एकमेकांशी बोलायला तयार नाही. मणिपूरमध्ये जे घडले तेच आजूबाजूच्या राज्यांमध्ये, महाराष्ट्राच्या शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये घडले. त्यामुळे महाराष्ट्रातही मणिपूरसारखे काही तरी घडण्याची चिंता वाटते, असे वक्तव्य पवारांनी नवी मुंबईतील सामाजिक ऐक्य परिषदेत केले.

पवारांनी मनातील मणिपूर बोलून दाखवला ः शिरसाट

पवारांनी त्यांच्या मनातील मणिपूर बोलून दाखवला आहे, अशी टीका शिवसेना (शिंदे) गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केली. शरद पवार यांनी त्यांच्या मनातील मणिपूर बोलून दाखवला आहे. एकीकडे जरांगे यांच्या आंदोलनातून बोलायचे, हाकेंच्या आंदोलनाला फुस लावायची आणि दुसरीकडे जातीय दंगली पेटणार आहेत, अशी भाकिते करायची, अशा शब्दांत शिरसाट यांनी पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

पवारांनी हातभार लावू नये; राज ठाकरेंची टीका

महाराष्ट्रातही मणिपूरसारखे घडेल, या वक्तव्याचा समाचार घेत राज ठाकरे यांनी शरद पवारांनी यात हातभार लावू नये, असा टोला लगावला आहे. फक्त मतांसाठी मन कलुषित करणे सुरू असून, हे चांगले लक्षण नाही. मी लहान मुलींचे व्हिडीओ पाहिले, ते अत्यंत दुर्दैवी आहेत. राजकारण्यांनी यावर विचार केला पाहिजे. जाती-पातीत विष कालवून मत मिळणार असेल, तर महाराष्ट्राचे भविष्य चांगले नाही, अशी खंतही ठाकरेंनी पुण्यात व्यक्त केली.

दंगल घडविण्याची भाषा योग्य नाही ः चंद्रशेखर बावनकुळे

पवारांचे वक्तव्य म्हणजे जणू काही दंगल घडविण्याची चिथावणी असल्याचा निष्कर्ष भाजपने काढला आहे. दंगल घडविण्याची शरद पवारांची भाषा योग्य नाही व हे चांगले नाही, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवारांवर टीका केली आहे. पवारांनी खरे तर जातीय तेढ संपवण्यासाठी पुढाकार घ्यावा. राज्यात दंगली होणारच नाहीत; कारण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहेत. पवारांनी दंगली घडतील असे भाकीत का वर्तविले, त्यांच्या मनात काय आहे, हे त्यांनाच विचारावे लागेल, असेही बावनकुळे म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT