मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण संस्था वगळता उर्वरित सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. सहकार विभागाने शुक्रवारी याबाबतचा आदेश जारी केला आहे. या निर्णयामुळे सहकारी बँका, पतसंस्था, साखर कारखाने, दूध संघ, खरेदी-विक्री संघ आदी सहकारी संस्थांच्या निवडणुकीला पुन्हा ‘ब्रेक’ लागला आहे.
नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीचा दुसरा टप्पा येत्या 20 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. याशिवाय मुंबईसह राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीच्या तयारीत संबंधित प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा पूर्णपणे गुंतलेली आहे. परिणामी सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ, पोलीस बंदोबस्त देण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने आदेशीत केलेल्या सहकारी संस्था वगळून राज्यातील इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पूर्ण होईपर्यंत पुढे ढकलण्यात येत असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. यापूर्वी पाऊस आणि अतिवृष्टीच्या संकटामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया. ज्या संस्थांमध्ये मतदार यादी प्रसिद्धीचा टप्पा सुरू झाला आहे, अशा संस्थांची कार्यवाही अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईपर्यंत चालू ठेवता येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.