Maharashtra Professors Jobs Latest Update
मुंबई : नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे (एनईपी) तिसरे वर्ष सुरू असूनही, त्यानुसार प्राध्यापकांचा कार्यभार कसा ठरवायचा याबाबत शासनाकडून कोणतेही स्पष्ट मार्गदर्शन झालेले नाही. त्यामुळे राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक ‘अतिरिक्त’ ठरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही विषयांतील विद्यार्थ्यांची संख्या घटल्याने 15 ते 20 टक्के प्राध्यापक इतरत्र बदली होण्याची शक्यता आहे.
असली, तरी शिक्षक कार्यभार मोजण्यासाठी सरकारचे जुने नियमच अद्याप लागू आहेत. हे नियम आता कालबाह्य ठरले असून त्यानुसार तपासणी झाली, तर 15 ते 20 टक्के प्राध्यापक अतिरिक्त घोषित होतील, अशी भीती आहे.
पूर्वी प्रत्येक 25 विद्यार्थ्यामागे एका भाषा शिक्षकाची नेमणूक केली जात होती. मात्र एनईपीनंतर विद्यार्थ्यांना प्रमुख, दुय्यम आणि खुला वैकल्पिक विषय निवडण्याची मुभा मिळाल्याने प्रत्येक विषयातील विद्यार्थ्याचे प्रमाण कमी झाले आहे, तर काही विषयांना अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कमी विद्यार्थी असेल तर या विषयाचा शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती आता अनेकांना सतावत आहे.
राज्यातील 10 बिगर कृषी विद्यापीठांतील साहाय्यित महाविद्यालयांमध्ये 2017 साली 31 हजार 185 प्राध्यापक पदे होती. मात्र 31 डिसेंबर 2024 पर्यंतच्या आरटीआय माहितीनुसार 11 हजार 918 पदे रिक्त आहेत. या रिक्ततेमुळे विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर बिघडले आणि राज्याची एनआयआरएफ क्रमवारीही खाली गेली, असे शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी कुशल मुडे यांनी सांगितले.
दरम्यान, एनईपीनुसार शिक्षकांचा कार्यभार ठरवण्यासाठीचे नवे निकष तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, त्याबाबत लवकरच सर्व महाविद्यालयांना कळवले जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. यामध्ये याबाबतही निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
भाषा शिक्षकांवर टांगती तलवार
मुंबईतील एका महाविद्यालयात 70 विद्यार्थी फ्रेंच विषय घेत असत. आता ती संख्या 30 पर्यंत घटली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांनी इतर विषयांची निवड केली. यामुळे विद्यार्थीसंख्या लक्षात घेता भाषा शिक्षक ‘अतिरिक्त’ ठरतील, असे मतही त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी व्यक्त केले. काही महाविद्यालयांमध्ये आधीच शिक्षकांची कमतरता असून तासिका तत्त्वावर अध्यापक नेमले आहेत. अशा वेळी काही विषयांचे शिक्षक अतिरिक्त झाले, तर आमच्यासमोर गंभीर अडचण उभी राहील,असे पार्ल्यातील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे म्हणणे आहे. हा प्रश्न प्रामुख्याने भाषा विषयांशी संबंधित असल्याने अनेक अडचणी येत आहेत. आणखी भविष्यात वाढतील, असेही त्यांनी नमूद केले.