मुंबई : ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुंतवणूक परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह स्वित्झर्लंडमधील दावोस येथे जाणार आहेत. हा आठ दिवसांचा दौरा आहे.
या परिषदेमध्ये महाराष्ट्रात जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक आणण्याच्या हेतूने आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. दावोस येथे 17 ते 24 जानेवारीदरम्यान जागतिक आर्थिक परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसाठी जगभरातील विविध देशांमधील, राज्यांतील प्रतिनिधींबरोबरच मोठमोठ्या नामांकित कंपन्यांही सहभागी होणार आहेत.
दौऱ्यात फडणवीस यांचे भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कौस्तुभ धवसे आदी या दौऱ्यात सहभागी होणार आहेत.
या महत्त्वपूर्ण दौऱ्यात जागतिक पातळीवरील उद्योगांसोबत अनेक सामंजस्य करार होणार असून, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्याबरोबरच यातून रोजगारनिर्मितीचे उद्दिष्टदेखील साध्य केले जाणार आहे.