Maharashtra Class 11 Admission Pudhari
मुंबई

Maharashtra Class 11 Admission: दहावीनंतरचे विद्यार्थी आहेत कुठ? अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश नोंदणीला कमी प्रतिसाद

मात्र, प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत केवळ 9 लाख 54 हजार 867 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

पवन होन्याळकर

मुंबई: राज्यात दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. यंदा राज्यभरातून दहावी उत्तीर्ण झालेल्या तब्बल 14 लाख 20 हजार 486 नियमित विद्यार्थ्यांसह रिपीटर आणि इतर मंडळांचे विद्यार्थी मिळून सुमारे 15 लाखांहून अधिक विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी पात्र आहेत. मात्र, प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत केवळ 9 लाख 54 हजार 867 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

राज्यात यंदा 7 लाख 34 हजार 814 मुले आणि 6 लाख 85 हजार 672 मुली असे एकूण 14 लाख 20 हजार 486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याशिवाय पुर्नपरिक्षार्थी 22 हजार विद्यार्थ्यांनीही यश मिळवले आहे. तसेच इतर बोर्डांचे सुमारे 1 लाखाहून अधिक विद्यार्थीही आहेत. एवढी मोठी संख्या असतानाही अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला अपेक्षित वेग येत नसल्याचे दिसून येत आहे.

यंदा राज्यातील 9 हजार 263 कनिष्ठ महाविद्यालयात 20 लाख 69 हजार 946 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत 16 लाख 10 हजार 293 जागा आहेत. कोट्यातील 4 लाख 59 हजार अशा मिळून तब्बल 20 लाख 67 हजार 563 जागा आहेत. मात्र त्या तुलनेत आता असलेली नोंदणी फारच कमी आहे.

गेल्यावर्षी राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातून नियमित 14 लाख 55 हजार 433 विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले होते. त्यामध्ये 7 लाख 60 हजार 325 मुले आणि 6 लाख 95 हजार 108 मुलींचा समावेश होता.

तसेच रिपीटरमधील 22 हजार 518 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. तर 9 हजार 548 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 21 लाख 69 हजार 657 जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी विविध फेरीत 14 लाख 85 हजार 686 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 13 लाख 47 हजार 811 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते.

यामध्ये एसएससी मंडळाच्या 12 लाख 44 हजार 434 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. तर सीबीएसईचे 72 हजार 68, आयसीएसईचे 18 हजार 759, आयजीसीएसईचे 2 हजार 199, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगचे 1 हजार 186 आणि इतर बोर्डांचे 9 हजार 111 असे सर्व मिळून 1 लाख 3 हजार 377 विद्यार्थी अकरावीच्या वर्गात गेले होते.

विशेष म्हणजे, आता या आठवड्यात पॉलिटेक्निक आणि आयटीआयच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्याने अनेक विद्यार्थी आणि पालक सध्या ‌‘वेट अँड वॉच‌’च्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे. पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला 20 मेपासून तर आयटीआय प्रवेशासाठी 21 मेपासून सुरुवात होत आहे. दुसरीकडे 26 मे रोजी अकरावीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.

गेल्या वर्षी पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांसाठी 1 लाख 40 हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. राज्यातील 416 संस्थांमध्ये 1 लाख 22 हजार 324 जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी 1 लाख 7 हजार 910 प्रवेश घेतले होते. तर आयटीआयमध्ये 2 लाख 46 हजार 12 अर्ज आले होते आणि 1 लाख 30 हजार 745 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता.

दहावीनंतर रोजगाराभिमुख शिक्षण देणाऱ्या पॉलिटेक्निक व आयटीआयकडे कल गेल्या दोन वर्षांपासून वाढत आहे. त्या प्रवेश प्रक्रियेचा अंदाज घेऊन विद्यार्थी निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे अकरावीच्या प्रवेश नोंदणीचा वेग सध्या मंदावल्याचे दिसत असल्याचेही कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांनी सांगितले.

पहिल्या नियमित फेरीचे वेळापत्रक

  • नवीन नोंदणी, भाग-1 दुरुस्ती आणि प्राधान्यक्रम 21 मे सकाळी 8 ते 22 मे सायंकाळी 6

  • कोटा प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी आणि लॉकिंग 21 ते 22 मे

  • अलॉटमेंट प्रक्रिया 23 ते 26 मे

  • पहिली गुणवत्ता/अलॉटमेंट यादी जाहीर 26 मे

  • कागदपत्र पडताळणी व शुल्क भरणे 26 ते 28 मे रिक्त जागांची माहिती जाहीर 29 मे

  • दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक 30 मे

अनेक विद्यार्थी पॉलिटेक्निक आणि आयटीआय अभ्यासक्रमांच्या जागा मर्यादित असल्याने सर्वच विद्यार्थी तिकडे वळतील, असे नाही. अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक अपेक्षेपेक्षा लवकर सुरू झाले आहे. शहरी भागात माहिती लवकर पोहोचते; मात्र ग्रामीण भागात अजूनही जनजागृतीचा अभाव आहे. त्यामुळे सध्या नोंदणीचा वेग कमी दिसत असला, तरी पुढील काही दिवसांत तो निश्चित वाढेल.
-प्रा. मुकुंद आंधळकर, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघे?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT