

मुंबई: विदेशात ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एका महिलेसह दोघांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. या दोघांकडून या अधिकाऱ्यांनी 13 कोटी 29 लाख रुपयांचा कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर दोन्ही आरोपींना किल्ला न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
विदेशातून ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत प्रचंड वाढ झाल्याने संंबंधित यंत्रणेने आंतरराष्ट्रीय विमानतळावर अशा ड्रग्ज तस्करांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना विदेशातून आलेल्या दोन प्रवाशांना शनिवारी डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते.
त्यात एका महिलेचा समावेश असून ती आदिस अबाबा येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती. तिची हालचाल संशयास्पद वाटताच या अधिकाऱ्यांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
तिच्यासह तिच्या सामानाची झडती घेतल्यानंतर त्यात या अधिकाऱ्यांना आठ पुड्या सापडल्या होत्या. त्यात कोकेन होते. ही कारवाई ताजी असताना दुसऱ्या कारवाईत या अधिकाऱ्यांनी एका पुरुष प्रवाशाला ताब्यात घेतले होते. त्याने कोकेन असलेल्या कॅप्सुल गिळल्या होत्या.
त्याच्या शरीरातून 70 हून अधिक कॅप्सूल बाहेर काढण्यात आले होते. त्यात 5 किलो 420 ग्रॅम कोकेन सापडले. या दोन्ही कारवाईत या अधिकाऱ्यांनी 13 कोटी 29 लाख रुपयांचा कोकेनचा साठा जप्त केला होता.
या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ठरावीक रकमेच्या कमिशनसाठी या दोघांनी कोकेनची तस्करी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.