मुंबई: यंदा अकरावीसाठी २१ लाख ९८ हजार ६६६ जागा उपलब्ध असताना आतापर्यंत केवळ ६ लाख ३५ हजार २६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे तब्बल १५ लाख ६३ हजार ६४० जागा अद्याप रिक्त असल्याचे अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, एकूण क्षमतेच्या तुलनेत केवळ २८.८८ टक्के जागांवर प्रवेश झाले असून ७१.१२ टक्के जागा अजूनही भरायच्या बाकी आहेत.
अकरावी प्रवेश प्रक्रियेत यंदा राज्यातील आठ विभागांतील ९ हजार ६४९ कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची मोठी संख्या अकरावीकडे वळली असली तरी प्रत्यक्ष प्रवेशाच्या बाबतीत अपेक्षित प्रतिसाद मिळालेला दिसत नाही.
विभागनिहाय आकडेवारी पाहिली असता मुंबई विभागात सर्वाधिक ४ लाख ७७ हजार २१० जागांची क्षमता आहे. मात्र तीन फेऱ्यांनंतर येथे १ लाख १५ हजार ६४० विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला असून ३ लाख ६१ हजार ५७० जागा रिक्त आहेत.
पुणे विभागात ३ लाख ९६ हजार २६६ जागांपैकी १ लाख १९ हजार ६४० प्रवेश झाले असून २ लाख ७६ हजार ६२६ जागा रिक्त आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागात २ लाख ४० हजार ५९५, नागपूरमध्ये १ लाख ५५ हजार ३०३, नाशिकमध्ये १ लाख ४७ हजार ४८६, कोल्हापुरात १ लाख ३९ हजार ४०३, अमरावतीत १ लाख २९ हजार ६७४, तर लातूर विभागात १ लाख १२ हजार ९८३ जागा अद्याप रिक्त आहेत.
तिसऱ्या नियमित फेरीची यादी २३ जूनला
अकरावीच्या केंद्रीभूत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत दुसऱ्या नियमित फेरीनंतर आता तिसऱ्या नियमित फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रवेश यादी २३ जून रोजी सकाळी १० वाजता जाहीर होणार असून, या फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना २५ जून सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची संधी असणार आहे.
यंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेत राज्यातील ९ हजार ६४९ कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी आतापर्यंत १३ लाख ७६ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. दुसऱ्या नियमित फेरीसाठी ५ लाख ९७ हजार ८५२ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरून सहभाग नोंदवला होता. त्यापैकी २ लाख ६५ हजार ५६२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. त्यापैकी १६ जूनपर्यंत १ लाख ९० हजार ७६६ विद्यार्थ्यांनी कॅपमधून प्रवेश निश्चित केला, तर विविध कोट्यांमधून ३१ हजार १५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामुळे तीन फेरीतून आता पर्यंत ६ लाख ३५ हजार २६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
शिक्षण संचालनालयाने तिसऱ्या नियमित फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या फेरीत नवीन विद्यार्थ्यांनाही नोंदणीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. १८ जून दुपारी ३ वाजल्यापासून २० जून सायंकाळी ६ वाजेपर्यंत नवीन नोंदणी, अर्जातील दुरुस्ती आणि महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्याची मुदत असेल. त्यानंतर २३ जून रोजी प्रवेश यादी जाहीर होणार आहे.