मुंबई : देश पातळीवर राबविण्यात येत असलेल्या बालविवाहमुक्त अभियानात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे, असा दावा राज्याच्या महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी केला आहे.
राज्यात अक्षय्य तृतीयेच्या दिवशी विवाहाचे प्रमाण अधिक असते. या दिवशी महिला व बालविकास विभागाने ‘स्पेशल फोर्स’च्या माध्यमातून तब्बल 32 बालविवाह रोखले. राज्य शासनाने बालविवाहमुक्त भारत या 100 दिवसांच्या अभियानांतर्गत जनजागृती, समन्वय आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविले. व्यवस्थापन, कुटुंबाचा सातत्याने पाठपुरावा, शिक्षण, कौशल्यविकास, समुपदेशन आणि पोषण सेवांशी समन्वय साधण्याचे काम या अभियानामार्फत राबविण्यात आले होते.
बालविवाह रोखण्याबरोबरच संबंधित बालिकांच्या पुनर्वसन, शिक्षण आणि संरक्षणासाठीही ठोस पावले उचलली जात आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या पालक व मध्यस्थांवर कारवाई केली जात आहे, अशी माहितीही तटकरे यांनी दिली.
जिल्हानिहाय रोखलेले बालविवाह
रायगड 2, पालघर 1, सांगली 1, नाशिक 2, अहिल्यानगर 5, परभणी 1, लातूर 1, बीड 3, हिंगोली 1, धाराशिव 2, संभाजीनगर 4, बुलडाणा 1, अकोला 4, यवतमाळ 2, चंद्रपूर 2 असे एकूण 32 बालविवाह रोखण्यात आले.