मुंबई : राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना आता मुंबईत येण्याची धावपळ करावी लागणार नाही, सीईटी परीक्षा आणि प्रवेश प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणींवर थेट स्थानिक स्तरावर उपाय मिळावा, यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मोठे पाऊल उचलले आहे. सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने राज्यभरात स्वतःची तब्बल 40 जिल्हास्तरीय मदत केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यातूनच सर्व प्रकारचे मार्गदर्शन, अर्ज प्रक्रियेतील सहाय्य आणि तक्रारींवर तत्काळ निवारण मिळणार आहे.
प्रवेश नियामक प्राधिकरण आणि सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) यांच्या समन्वयातून तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण, वैद्यकीय शिक्षण,आयुष शिक्षण,कृषी शिक्षण व कला शिक्षण या सहा विभागांतर्गत एकूण 20 विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन सामाईक प्रवेश परीक्षा व 73 अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येतात.
हे प्रवेश 5700 पेक्षा जास्त शैक्षणिक संस्थामधून दिले जातात. तसेच प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून प्रवेश मान्यतेची प्रक्रिया राबविण्यात येते. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यावर्षी 14 लाख विद्यार्थी सहभागी झाले. पुढील वर्षीच्या प्रवेशाची तयारी सुरु आतापासूनच झाली आहे.
राज्यातील कोणत्याही विद्यार्थ्याला सीईटी परीक्षा, निकाल, दस्तऐवज पडताळणी किंवा प्रवेशासंबंधी तक्रार असल्यास त्याला थेट मुंबईतील सीईटी कक्षाशी संपर्क साधावा लागत होता. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा आणि प्रयत्न वाया जात होते.
या पार्श्वभूमीवर विभागाने सर्वच जिल्ह्यांमध्ये मदत केंद्रांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रांमधून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी लागणाऱ्या सर्व तांत्रिक टप्प्यांचे मार्गदर्शन मिळेल. लॉगिन, अर्ज भरणे, शुल्क भरणे, अपलोडिंग, पर्याय क्रमांक निश्चिती, दस्तऐवज पडताळणी, तसेच आरक्षणाशी संबंधित तांत्रिक शंका यावर प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून थेट सहाय्य दिले जाणार आहे. शिवाय, विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांचे निराकरण स्थानिक स्तरावरच करण्यात येईल, हे या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य असणार आहे.
आतापर्यंत जिल्हास्तरीय केंद्रे केवळ औपचारिक स्वरूपात होती; परंतु आता प्रत्येक जिल्ह्यात पूर्णवेळ कार्यरत आणि सुसज्ज असे केंद्र उपलब्ध करून दिले जाईल. या केंद्रावर विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतील मार्गदर्शन, कागदपत्रांची पडताळणी, तक्रार निवारण, अशा सेवा दिल्या जाणार आहेत, असे उच्च व तंत्रशिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
राज्यातील परीक्षा पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी सरकारने 20 हजार संगणकाधारित परीक्षा केंद्रांची उभारणी करण्याचे ठरवले आहे. सध्या केवळ सात हजार संगणक उपलब्ध असल्याने सीईटी कक्षाला खासगी एजन्सीमार्फत केंद्रांचा वापर करावा लागत आहे. आता राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालये आणि विद्यापीठ परिसरांमध्ये हाय-स्पीड इंटरनेटसह आधुनिक संगणकसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या माध्यमातून परीक्षा अधिक कार्यक्षमपणे घेता येतील. ही सुविधा वर्षभर शैक्षणिक उद्देशांसाठी वापरता येणार आहे.