MHT CET Pudhari
मुंबई

CET Merit List Controversy: सीईटीच्या जुन्या गुणवत्ता यादीवरून सोशल मीडियावर खळबळ; यादी खोटी असल्याचे सीईटी कक्षाचे स्पष्टीकरण

झालेले आरोप सीईटी सेलने एक पत्रक काढत खोडून काढले.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा 2025-26 च्या अभियांत्रिकी प्रवेशासाठीच्या तात्पुरत्या गुणवत्ता यादीवरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला. काही विद्यार्थ्यांच्या गुणांचा तपशील असलेली एक कथित गुणवत्तायादी समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी राज्य सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी केली. मात्र त्यानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने खुलासा करत ही यादी खोटी असल्याचे म्हटले आहे.

देशभरात वैद्यकीय प्रवेशासाठीच्या ‌‘नीट‌’ परीक्षेतील कथित गैरप्रकारांवरून आधीच गदारोळ सुरू असताना आता राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या गतवर्षीच्या गुणवत्तायादीवरूनही संशयाचे वातावरण निर्माण झाले. समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या कथित गुणवत्तायादीमुळे सीईटी प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र झालेले आरोप सीईटी सेलने एक पत्रक काढत खोडून काढले.

राजकीय विश्लेषक गुरदीप सिंग सप्पल यांनी एक्स या समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमधून या प्रकरणाची सुरुवात झाली. त्यांनी काही विद्यार्थ्यांच्या गुणांचा तपशील असलेली एक यादी शेअर करत राज्य सरकारच्या सीईटी निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या पोस्टमध्ये 7 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल, तर 13 विद्यार्थ्यांना 99.999 पर्सेंटाइल मिळाल्याचा उल्लेख करण्यात आला होता. यानंतर सचिन सावंत यांनी ही पोस्ट पुनर्प्रसारित करत महाराष्ट्र सरकार आणि महायुतीतील नेत्यांवर निशाणा साधला.

सावंत यांनी आपल्या पोस्टमध्ये दावा केला की, कथित गुणवत्तायादीतील अनुक्रमांक 1, 2, 5, 9, 13 आणि 15 वरील विद्यार्थ्यांचे बारावीतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांतील गुण 41 ते 49 टक्क्यांच्या दरम्यान आहेत. तसेच अनुक्रमांक 1, 2, 5, 9 आणि 15 या विद्यार्थ्यांचे दहावीतील गुणही 36 ते 45 टक्क्यांच्या आसपास असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये 100 पर्सेंटाइल मिळणे संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले.

सीईटी सेलच्या अधिकृत गुणवत्तायादीतील विद्यार्थ्यांच्या अर्ज क्रमांकाची सुरुवात ‌‘ईएन‌’ या अक्षरांनी होते. मात्र व्हायरल करण्यात आलेल्या कथित यादीमध्ये अर्ज क्रमांकाची सुरुवात ‌‘पीसीएम‌’ ने होत असल्याचे दिसून येते.

याशिवाय विद्यार्थ्यांचा प्रवर्ग, दहावी-बारावीतील गुण आणि सीईटीमधील पर्सेंटाइल गुण यामध्येही मोठी विसंगती आहे. त्यामुळे समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेल्या या गुणवत्ता यादीच्या इमेजला सीईटी कक्षाची कोणतीही मान्यता नाही. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अशा या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सीईटीने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT