NEET Re-Exam Controversy: आमची चूक काय होती? किमान माफी तरी मागा! नीट पेपरफुटीनंतर विद्यार्थिनीचा एनटीएवर भावनिक उद्रेक

भावनिक पत्र सोशल मीडियावर व्हायरल
NEET Re-Exam Controversy
NEET Re-Exam ControversyPudhari
Published on
Updated on

मुंबई: दोन वर्ष परीक्षेची तयारी करत होते. सोशल मीडिया बंद केला, मित्रांपासून दूर राहिले, समारंभ टाळले; इतकेच नव्हे तर स्वतःच्या भावंडांनाही नीट भेटू शकले नाही. डॉक्टर होण्याच्या स्वप्नासाठी केलेल्या या त्यागानंतरही अखेर पुनर्परीक्षेचा धक्का बसल्याने एका विद्यार्थिनीने राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) विरुद्ध तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

नीट पुनर्परीक्षेच्या एनटीएने घेतलेल्या निर्णयानंतर एका 18 वर्षीय नीटच्या विद्यार्थिनीने राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए)ला लिहिलेले भावनिक आणि तिखट शब्दांतले पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पत्रातून लाखो विद्यार्थ्यांच्या मनातील वेदना, असुरक्षितता आणि व्यवस्थेविषयीचा तुटलेला विश्वास स्पष्टपणे समोर आला आहे.

NEET Re-Exam Controversy
Student Transport: डोंगरपाड्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा!राज्यातील 24 हजार 825 विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत मिळणार वाहतूक सुविधा

तिने पुढे लिहिले की, परीक्षा जवळ येत असताना मानसिक ताण प्रचंड वाढत होता. त्यातच परीक्षेच्या सुमारे दहा ते बारा दिवस आधी एनटीएकडून जारी करण्यात आलेल्या कडक सूचनांनी विद्यार्थ्यांची भीती आणखी वाढवली. ही काही शाळेची परीक्षा नाही, ही राष्ट्रीय स्तरावरील फिल्टरेशन परीक्षा आहे, अशा शब्दांत विद्यार्थ्यांना दिलेल्या इशाऱ्याचा उल्लेख करत विद्यार्थिनी म्हणते, खरंच ही शाळेची परीक्षा नव्हती, कारण किमान शाळेच्या परीक्षेत तरी पेपर फुटत नाही.

विद्यार्थिनीने परीक्षा केंद्रावर झालेल्या तपासणीचे वर्णन करताना लिहिले की, आम्हाला पारदर्शक पाण्याची बाटलीदेखील आत नेता येणार नाही, असे सांगण्यात आले. प्रचंड उष्णतेतही आम्ही ते मान्य केले, कारण स्वप्न महत्त्वाचे होते. मात्र तपासणीच्या नावाखाली मुलींना केस मोकळे करून दाखवायला लावले गेले.

कर्मचारी बोटांनी केस तपासत होते. खिशांची शंका आल्यास टी-शर्ट आणि पँट कापल्या जात होत्या. इतक्या कडक तपासणीनंतर तरी परीक्षा सुरक्षित असेल, असा विश्वास विद्यार्थ्यांना होता. मोठमोठी आश्वासने व इशारे दिल्यामुळे यावेळी पेपर फुटणार नाही, असा विश्वास वाटला होता. पण आमची लढाई फक्त नीटच्या प्रश्नपत्रिकेशी नसून संपूर्ण व्यवस्थेशी आहे, हे आता समजले, असे पत्रात म्हटले आहे.

NEET Re-Exam Controversy
Mumbai Blood Shortage: मुंबईत रक्ताचा तुटवडा गंभीर; अनेक सरकारी रक्तपेढ्या ‌‘रेड झोन‌’मध्ये

ठीक आहे, आम्ही पुन्हा अभ्यास करू. पुन्हा त्या अपमानास्पद तपासणीला सामोरे जाऊ. पण एवढं सगळं झाल्यानंतर फक्त ‌‘पेपर मोठ्या प्रमाणावर फुटला म्हणून पुनर्परीक्षा होणार‌’ एवढं सांगणं पुरेसं आहे का? विद्यार्थ्यांची माफी मागावी, असं तुम्हाला वाटत नाही का? असा थेट सवाल विद्यार्थिनीने एनटीएला केला आहे.

अस्वस्थ वेदना...

परीक्षा झाल्यानंतर आम्ही आनंदात होतो. अखेर भावंडांसोबत वेळ घालवता येणार होता. पण फक्त दोन दिवसांतच पुनर्परीक्षेची बातमी आली आणि आमचा सगळा आनंद पुरात वाहून गेलेल्या घरासारखा कोसळला.

आज माझी लहान भावंडे म्हणतात की भारतात शिकण्याची इच्छा होत नाही. मग मी अभिमानाने कसे म्हणू की आम्हाला या देशाचा अभिमान आहे? आज मला वाटते, जर सीमा आणि बंधने नसती तर कदाचित मी या देशात राहण्याचाही विचार केला नसता, अशा भावना विद्यार्थिनीने नमुद केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news