मुंबई : चंदन शिरवाळे
पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांच्या पळवा-पळवीवरून भाजपावर नाराज झालेल्या शिंदे गटाच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घालण्याचे धाडस दाखवले असताना, भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन माजी आमदारांना आपल्या राहुटीत ओढले आहे. तरीही, उपमुख्यमंत्री अजित पवार शांत बसल्यामुळे त्यांच्या संयमाबाबत राजकीय क्षेत्रात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर महायुतीमधील तिन्ही सत्ताधारी पक्षांनी सुरुवातीला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि मनसेच्या माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे . पदाधिकाऱ्यांच्या पळवापळवीची सर्वाधिक झळ उबाठा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बसली आहे. या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना शिंदे गट आणि राष्ट्रवादीकडून होलसेल प्रवेश दिले.
विरोधी पक्षातील ताकदवान नेते आणि पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेणे, हा सत्ताधारी पक्षांचा राजकीय गुणधर्म समजला जातो. पण मागील काही महिन्यांपासून सत्ताधारी पक्षामध्येच एकमेकांकडील नेते, पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक आणि आमदारांना आपल्याकडे खेचण्याची स्पर्धा लागली आहे. नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतरसुद्धा ही स्पर्धा कायम असल्यामुळे शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घालून आपली नाराजी व्यक्त केली.
प्रवेशाच्या गर्दीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळमधील यशवंत माने आणि राजन पाटील या माजी आमदारांना भाजपाने पळविले. पण शिंदे गटाप्रमाणे अजित पवार यांनी जाहीर नाराजी प्रकट केली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी-पाटोदा- शिरूरमधील भाजपाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश दिला आहे. भाजपाने दोन माजी आमदार पळविल्याचा हा राग असल्याचे राष्ट्रवादीत बोलले जात आहे. प्रत्यक्षात, धोंडे यांनी स्थानिक राजकारणाचा विचार करून भाजपाला सोडचिट्ठी दिली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या संयमाविषयी चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवार यांच्या संयमामागील कारणे
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटींचा गैरव्यवहाराचा आरोप.
पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील महार वतनाच्या जमिनीची केलेली खरेदी. 1800 कोटी रुपयांच्या जमिनीची केवळ 300 कोटी रुपयांना खरेदी.
मुंबई महानगरपालिकेच्या गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय सार्वजनिक - खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर अजित पवार यांच्या नातेवाइकांना देण्यात येत असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. यामध्ये पाचशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचेही दमानिया यांचे म्हणणे आहे.
वित्तमंत्री म्हणून आपल्याच पक्षाच्या आमदारांना अधिक निधी वितरित केल्याचा आरोप.