Agriculture Admission 2026 Pudhari
मुंबई

Agriculture Admission: राज्यात कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीला सुरुवात

Agriculture Courses: सीईटी कक्षामार्फत नऊ व्यावसायिक कृषी पदवी अभ्यासक्रमांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू; ऑनलाइन अर्जाची अंतिम मुदत २५ जुलै

पुढारी वृत्तसेवा

Maharashtra Agriculture CET admission 2026

मुंबई: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून ऑनलाईन नोंदणी व अर्ज भरण्याची अंतिम मुदत २५ जुलै आहे. राज्यातील चार कृषी विद्यापीठांअंतर्गत नऊ व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

राज्यातील १९५ कृषी महाविद्यालयांमध्ये एकूण १७ हजार ५८६ प्रवेश क्षमता उपलब्ध आहे. या प्रक्रियेत बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी, बी.एस्सी. (ऑनर्स) उद्यानविद्या, बी.एस्सी. (ऑनर्स) वनविद्या, बी.एफ.एस्सी. मत्स्य विज्ञान, बी.टेक. कृषी अभियांत्रिकी, बी.टेक. अन्न तंत्रज्ञान, बी.एस्सी. (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान, बी.टेक. जैवतंत्रज्ञान आणि बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी व्यवसाय व्यवस्थापन या नऊ चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

एमएचटी-सीईटी २०२६ तसेच संबंधित अभ्यासक्रमांसाठी पात्र असलेल्या इतर राष्ट्रीय प्रवेश परीक्षांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी सीईटीच्या संकेतस्थळावरील संबंधित लिंकद्वारे विहित मुदतीत ऑनलाईन नोंदणी करून अर्ज सादर करावेत. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करणे बंधनकारक राहणार आहे.

कृषी अभियांत्रिकी विद्याशाखा वगळता इतर सर्व पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी, जेईई तसेच नीट (NEET) या परीक्षांपैकी पात्रता ग्राह्य धरली जाणार आहे. मात्र, नीटचा निकाल अद्याप जाहीर झालेला नसल्याने प्रवेश प्रक्रिया वेळेत सुरू करण्यासाठी सीईटी कक्षाने तात्पुरते वेळापत्रक जाहीर केले आहे.

अंतरिम गुणवत्ता यादी, ऑनलाईन हरकती, अंतिम गुणवत्ता यादी, जागांची घोषणा, प्रवेश वाटप फेऱ्या, केंद्रीभूत व महाविद्यालयस्तरीय प्रवेश प्रक्रिया यांचे सविस्तर वेळापत्रक नीटचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

प्रवेश नियमावली, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वेळापत्रक आणि पुढील सर्व सूचना संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी नियमितपणे संकेतस्थळाला भेट देऊन अद्ययावत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षानेकेले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT