

मुंबई: तरुण पिढीला पोखरू पाहणाऱ्या अमली पदार्थांना ठिकठिकाणी पोहोचवण्यासाठी तस्करांकडून आता ड्रोनचा वापर होत आहे. गेल्या पाच वर्षांत ड्रोनच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी करण्याच्या घटनांमध्ये तब्बल १०० पट वाढ झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या प्रकारामुळे तस्करांची साखळी शोधणे, त्यांचा माग काढणे तपास यंत्रणांना अवघड होत चालले आहे.
पंजाबमध्ये अशा तस्करीचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्या पाठोपाठ राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यांत ड्रोनच्या मदतीने अमली पदार्थ पोहोचवण्याचे तस्करांकडून प्रयत्न होत आहेत.
२०२५ च्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या वार्षिक अहवालानुसार, २०२१ मध्ये केवळ ३ ड्रोन-संबंधित घटना नोंदल्या गेल्या होत्या. मात्र २०२५ मध्ये हा आकडा वाढून ३०५ वर पोहोचला. या घटनांमध्ये प्रामुख्याने उच्च दर्जाचे हेरॉईन आणि मेथॅम्फेटामाइन यांचा समावेश आहे.
भारत-पाकिस्तान सीमेवरील भाग, विशेषतः पंजाब, हे या हवाई तस्करीचे प्रमुख केंद्र बनले आहे. देशातील एकूण ३०५ ड्रोन घटनांपैकी २९८ घटना एकट्या पंजाबमध्ये नोंदवल्या गेल्या आहेत. या कारवायांमधून ४६८ किलो उच्च दर्जाचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
ड्रोन तस्करीतून होणाऱ्या अमली पदार्थांच्या जप्तीच्या प्रमाणात २०२१ ते २०२५ दरम्यान ७७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच टपाल आणि कुरिअर नेटवर्कच्या माध्यमातून होणारी तस्करीही मोठे आव्हान ठरत आहे.
अहवालानुसार, देशातील विविध भागांत कृत्रिम (सिंथेटिक) अमली पदार्थ तयार करणाऱ्या गुप्त प्रयोगशाळांची वाढ होत आहे. महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये मेफेड्रोन, इफेड्रिन आणि बेकायदेशीर सायकोट्रॉपिक गोळ्यांचा मोठ्या प्रमाणावर साठा जप्त करण्यात आला आहे.
पालघर, भिवंडी, सांगली येथे अमली पदार्थ तयार करणारे कारखाने गेल्या सहा महिन्यांत उदध्वस्त करण्यात आल्याने तस्करांना मोठा चाप बसला होता. मात्र ड्रोनच्या मदतीने ही तस्करी सीमेपलीकडून करता येते हे उघड झाल्याने सुरक्षा दलासह सर्व संबंधित यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत.
सरकारने अमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करण्यावर भर दिला असून, जलद सुनावणी आणि कठोर कारवाईद्वारे या समस्येवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र ड्रोन तस्करीचा माग लागत नसल्याने पोलीस आणि अमली पदार्थविरोधी यंत्रणेची डोकेदुखी वाढत चालली आहे.
महामुंबईसारख्या ठिकाणी जेथे सतत अमली पदार्थ पोहोचवणाऱ्या तस्करांच्या हालचाली टिपून त्यांना पकडण्याचे काम सुरू असते तेथे पोलिसांचे काम आणखी वाढले आहे.
मुंबईत संशयास्पद ड्रोन शो
मेमध्ये मुंबईच्या वांद्रे विंग्स स्पोर्ट्स क्लब मैदानावर ड्रोन शो आयोजित करण्यात आला होता. हा शो सुरू होईपर्यंत त्याची माहिती पोलिसांना नव्हती. शो सुरू झाल्यानंतर पोलीस तेथे पोहोचले. मैदानावर व्हिडीओ शूटिंगसाठी शेकडो ड्रोन एकाच वेळी उडवले जात असल्याचे त्यांना दिसले.
पोलिसांनी तत्काळ हा शो थांबवला आणि या शोची देखरेख करणाऱ्या दक्षिण दिल्लीतील संगम विहार येथील रहिवासी आणि बोल्डसन मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील व्यवस्थापक गोपाल नारायण सिंहला ताब्यात घेतले.चौकशीदरम्यान सिंहने सांगितले की, कंपनीच्या जाहिरातीच्या शूटिंगसाठी ड्रोन ऑपरेशन केले जात होते.
मात्र, मुंबईच्या हद्दीत ड्रोन उडवण्यासाठी आवश्यक परवानग्या सादर करण्यास सांगितल्यावर त्याच्याकडे मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय किंवा संबंधित कोणत्याही प्राधिकरणाची वैध परवानगी नसल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी सतर्क होऊन याचा अमली पदार्थ तस्करी अथवा काही विघातक कारवायांशी काही संबंध आहे का, याचा तपास सुरू ठेवला आहे.