

कुर्ला: चेंबूरच्या मरवली चर्च परिसरात असलेल्या एका खासगी शाळेची इमारत सध्या धोकादायक स्थितीमध्ये आहे. त्यामुळे होणाऱ्या दुर्घटनेपासून बचाव करण्यासाठी शाळेने याठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइनची सक्ती केली आहे.
मात्र पालकांनी शाळेच्या ऑनलाइन अभ्यासक्रमाला विरोध दर्शवला असून मुलांना याच परिसरातील एखाद्या शाळेमध्ये शिकवण्यात यावे, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून चेंबूरच्या मरवली चर्च परिसरात असलेल्या सिंद कॉस्मोपोलिटी या शाळेची इमारत धोकादायक स्थितीमध्ये आहे. मात्र याठिकाणी असलेल्या कमिटीच्या वादामुळे गेल्या अनेक वर्षांत या शाळेची डागडुजी झालेली नाही.
परिणामी गेल्या काही महिन्यांमध्ये अनेकदा या शाळेचा स्लॅब पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी काही पालकांना शाळेच्या या इमारतीच्या दुरवस्थेबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मुलांना शाळेत पाठवण्यास विरोध केला. त्यामुळे शाळा प्रशासनाने या शाळेत शिकणाऱ्या साडेपाचशे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचे ठरवले आहे.
मात्र पालकवर्गांनी मुलांना ऑनलाइन शिक्षण देण्यास विरोध दर्शवला असून परिसरातील पालिकेच्या एखाद्या रिकाम्या शाळेच्या वर्गात मुलांना शिकवण्यात यावे, अशी मागणी पालकांची आहे.
याबाबत दोन दिवसांपूर्वी सर्व पालकांनी चेंबूर येथील राज्य शासनाच्या उत्तर विभागाच्या शिक्षण निरीक्षक कार्यालयात आंदोलन करत शिक्षक निरीक्षक मुस्ताक शेख यांची भेट घेतली. मुस्ताक शेख यांनी यावेळी पालकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पालिका अधिकाऱ्यांना पत्र देऊन परिसरातच एखाद्या शाळेत मुलांची सोय करण्याचे आश्वासन दिले आहे.
पुन्हा आंदोलनाचा इशारा
घरी मुलांना ऑनलाईन शिक्षण देणे शक्य नाही. अनेक पालक कामाला जातात, तर काही घरात दोन ते तीन मुले असल्याने सर्वांसाठी मोबाईल देणे शक्य नाही. शाळेने काही दिवसांसाठी मुलांची इतरत्र सोय करावी, त्यानंतर काही दिवसांत डागडुजी करून पुन्हा याच शाळेत मुलांना शिक्षण द्यावे. अन्यथा येत्या आठ दिवसांत पुन्हा शिक्षण निरीक्षक कार्यालयावर मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी पालकांनी दिला आहे.