राज्यात 19 लाख नवीन मतदार Pudhari File Photo
मुंबई

Voter Registration: राज्यात 19 लाख नवीन मतदार

राज्यात 9 कोटी 84 लाखांवर मतदारसंख्या

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदारांची अद्ययावत यादी जाहीर केली आहे. आयोगाने 1 जुलै 2025 रोजीची अंतिम मतदार यादी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली असून, या नव्या यादीप्रमाणे राज्यातील एकूण मतदारसंख्या 9 कोटी 84 लाख 96 हजार 626 इतकी झाली आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी ही संख्या 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 इतकी होती. त्यामुळे केवळ सात महिन्यांत जवळपास 14.7 लाख नव्या मतदारांची वाढ झाली असून 4 लाख नावे वगळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या काही महिन्यांत मतदार नोंदणीसाठी नागरिकांचा उत्साह वाढलेला दिसतो. या कालावधीत 18 लाख 80 हजार 553 नव्या मतदारांची नोंदणी झाली आहे, तर 4 लाख 9 हजार 46 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. राज्यातील मतदारसंख्या वाढीचा हा कल आगामी स्थानिक निवडणुकांवर परिणाम करणारा ठरू शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे. विशेष म्हणजे तरुण मतदार आणि प्रथमच मतदानाचा अधिकार मिळवणार्‍या युवकांची संख्या या वर्षी लक्षणीयरीत्या वाढली असून, निवडणुकीतील समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नव्या मतदारांची नोंदणी सर्वाधिक ठाणे जिल्ह्यात झाली आहे. ठाणे जिल्ह्यात 2 लाख 71 हजार 666 नव्या मतदारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्याच वेळी, या जिल्ह्यात 45 हजार 800 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. पुणे जिल्ह्यात 1 लाख 82 हजार 490 नवमतदारांची नोंदणी, तर मुंबई उपनगरात 95 हजार 630 नव्या मतदारांची भर पडली आहे. मुंबई उपनगरातील 44 हजार मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. ग्रामीण भागात मात्र मतदार नोंदणीचा वेग तुलनेने मंदावलेला दिसतो. निवडणूक आयोगाच्या मते, अनेक नागरिकांनी डिजिटल पद्धतीने आपले अर्ज सादर केले असून, ऑनलाईन प्रणालीच्या वापरामुळे नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जलद झाली आहे.

परदेशातील नागरिकांचे फॉर्म क्रमांक 6-अ द्वारेही काही अर्ज

राज्य निवडणूक आयोगाकडे मतदार नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्जांची नोंद झाली आहे. फॉर्म क्रमांक 6 द्वारे 16 लाख 83 हजार 573 नागरिकांनी नावे नोंदवण्यासाठी अर्ज सादर केले आहेत. तसेच परदेशात राहणार्‍या भारतीय नागरिकांसाठी असलेल्या फॉर्म क्रमांक 6-अ द्वारेही काही अर्ज आले आहेत. या सर्व अर्जांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच मतदार यादी अंतिम करण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. राज्यभरात मतदारांच्या नाव, पत्ता, वय किंवा इतर तपशिलांतील त्रुटी दूर करण्याचेही काम निवडणूक आयोगाने हाती घेतले आहे.

राज्याचा मतदार वर्ग अधिक सजग आणि सक्रिय

राज्यातील मतदारसंख्या वाढीमुळे आणि निवडणूक आयोगाच्या या नव्या निर्णयांमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिक रोचक ठरण्याची चिन्हे आहेत. नव्या मतदारांचा कल, स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे, तसेच चिन्हांच्या स्पष्टतेमुळे मतदारांमध्ये निर्माण होणारा गोंधळ, या सर्व घटकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्याचा मतदार वर्ग अधिक सजग आणि सक्रिय होत आहे, आणि त्याचा थेट परिणाम येणार्‍या निवडणूक निकालांवर दिसून येईल, अशी अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT