

नाशिक/सिडको : नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २४ मधील मतदार याद्यांमध्ये गंभीर त्रुटी असल्याबाबतचा आक्षेप शिंदेसेनेचे महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक प्रविण तिदमे यांनी घेतला होता. त्याची गंभीर दखल घेत नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्याने मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना चौकशी आणि दोष दुरुस्तीचे आदेश दिले आहेत.
तिदमे यांनी जिल्हाधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात प्रभाग २४ मधील मतदार याद्यांमध्ये ९१८८ मतदारांचे पत्ते अनुपस्थित, तर ४७३ मतदारांची नावे दुबार तसेच काही मतदारांची नावे देवळाली मतदारसंघात असल्याचे नमूद केले होते. या तक्रारीची पडताळणी करून नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रस्तरित अधिकाऱ्यांना देवळाली विधानसभा मतदारसंघ आणि जिल्ह्यातील अन्य निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांना दुबार नावे, बोगस नोंदी आणि पत्तेविना मतदार शोधून वगळण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, यासाठी संबंधितांना बीएलओ ॲपद्वारे नावे पडताळणी करून नमुना ७ आणि ८ भरून केलेल्या कामकाजाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधून पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.