11th admission  file photo
मुंबई

11th Admission Maharashtra: अकरावी प्रवेशाची पहिली यादी आज; मुंबईतील नामांकित महाविद्यालयांत पुन्हा ‌‘90 प्लस‌’ची चुरस

दहावीचा निकाल घसरला असला, तरी गुणवंतांची संख्या कायम असल्याने विज्ञान शाखेतील कटऑफ 90 ते 95 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त होत असून, प्रवेशासाठी पहिल्या यादीत चुरस होण्याची शक्यता आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यातील अकरावी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीकडे लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले असताना, मुंबईतील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये यंदाही ‌‘90 प्लस‌’ विद्यार्थ्यांचीच चलती राहण्याची चिन्हे आहेत.

दहावीचा निकाल घसरला असला, तरी गुणवंतांची संख्या कायम असल्याने विज्ञान शाखेतील कटऑफ 90 ते 95 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त होत असून, प्रवेशासाठी पहिल्या यादीत चुरस होण्याची शक्यता आहे.

राज्यातील अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिली गुणवत्ता यादी आज (शुक्रवारी) सकाळी 11 वाजता जाहीर होणार असून, कॅप व कोटा फेरी 1 अंतर्गत प्रवेश प्रक्रिया 3 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

यंदा राज्य मंडळासोबतच सीबीएसई व आयसीएसई मंडळांचे निकालही चांगले लागल्याने मुंबई महानगर क्षेत्रात तिन्ही मंडळांतील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र स्पर्धा अपेक्षित आहे. दुसरीकडे 85 ते 90 टक्के गटातील विद्यार्थ्यांची संख्या 3 हजार 17 ने घटली आहे.

तसेच 80 ते 85 टक्के गटात 3 हजार 218, तर 75 ते 80 टक्के गटात 2 हजार 543 विद्यार्थ्यांची घट झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी 85 ते 90 टक्क्यांदरम्यान बंद झालेल्या काही महाविद्यालयांच्या कटऑफमध्ये 1 ते 3 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई विभागात यंदा 1 हजार 300 महाविद्यालयांमध्ये 4 लाख 76 हजार 250 जागा उपलब्ध आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ 3 महाविद्यालयांची घट झाली असून 60 जागांची वाढ झाली आहे.

मुंबई शहर व उपनगरांत मात्र 1 हजार 430 जागा कमी झाल्या असून येथे 1 लाख 99 हजार 70 जागा उपलब्ध आहेत. दुसरीकडे ठाणे जिल्ह्यात 1 हजार 120 जागांची वाढ होऊन एकूण जागा 1 लाख 60 हजार 840 वर पोहोचल्या आहेत. रायगडमध्ये 340, तर पालघरमध्ये 30 जागांची वाढ झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT