

कोपरखैरणे: नेरुळ येथील टी. एस. चाणक्य शैक्षणिक संस्थेत शिकणाऱ्या एका 19 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर विद्यार्थ्याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा दावा मयत विद्यार्थ्याच्या नातेवाइकांनी केला आहे. तर प्राथमिक माहितीनुसार ही आत्महत्या असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
आत्महत्या केलेला विद्यार्थी मूळ बिहार येथे राहणारा असून सोमनाथ असे त्याचे नाव आहे. टी. एस. चाणक्य अकादमीमध्ये तो पहिल्या वर्षात शिकत होता. तो याच परिसरात असणाऱ्या वसतिगृहात तिसऱ्या माळ्यावर राहत होता.
त्याच्यासोबत अजून एक विद्यार्थी राहत होता. बुधवारी रात्री त्याने खिडकीतून खाली उडी मारली. तळ मजल्यावरील लोकांना काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने त्यांनी आसपास पाहणी केली असता तिसऱ्या मजल्यावरून सोमनाथ पडल्याचे दिसून आले. यानंतर लोकांनी त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
नातेवाईक, पोलिसांचे काय म्हणणे आहे?
तरुणाच्या अंगावर जखमा आहेत. त्यामुळे त्याने आत्महत्या केली नसून त्याला ठार मारण्यात आले आहे, असा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांना विचारणा केली असता त्यांनी ही आत्महत्या असल्याचे स्पष्ट केले. त्याने आत्महत्या का केली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
त्याने आत्महत्या करण्यापूर्वी काहीही लिहून ठेवलेले आढळून आले नाही. त्याचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. मात्र त्याला पासवर्ड असल्याने फॉरेन्सिक विभागाकडे देण्यात आला आहे. त्यातून आत्महत्येचे कारण माहिती करून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.