महाड : महाड-पोलादपूरच्या जनतेला खऱ्या अर्थाने निर्भय वातावरणात भविष्य काढायचे असेल, सर्वसामान्य माणसाला विकासापासून दूर ठेवणाऱ्यांना बाजूला करायचे असेल तर भाजपा-राष्ट्रवादी युतीशिवाय पर्याय नाही. दादागिरी, गुंडगिरी करणाऱ्यांचा राजकीय ऱ्हास करणारी ही निवडणूक आहे. ही लढाई महाडच्या मातीच्या अस्तित्वाची आणि संस्काराची आहे, असे प्रतिपादन भाजपचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी करंजखोल येथील जाहीर सभेत केले.
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ आ. प्रवीण दरेकरांच्या प्रमुख उपस्थितीत महाड येथील करंजखोल येथे जाहीर सभा झाली. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, भाजपा नेते बिपीन म्हामुणकर, नागेंद्र राठोड, नगरसेवक सुनिल पवार, नगरसेवक सुरज बामणे, जिल्हा परिषदेचे उमेदवार निलेश महाडिक, पंचायत समितीचे उमेदवार चैत्राली दिघे, सुरज जामदार, दिनेश तळवटकर, संदीप ठोंबरे, कृष्णा शिंदे, नीलिमा भोसले, मंजुषा कुद्रूमूर्ती, महेश शिंदे, शशिकांत वैराले, सुनीता महाडिक, सरपंच चंद्रकांत मोरे यांसह भाजपा-राष्ट्रवादी युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करंजखोलच्या सभेत आ. दरेकर म्हणाले, जिल्हा परिषदेची निवडणूक आपल्या गावाचे नेतृत्व कुणी करावे, अडचणीच्या गोष्टी कुणी सोडवाव्यात हे ठरविणारी असते. या निवडणुकीत फिरताना एकच गोष्ट सतत कानी पडते, ती म्हणजे दडपशाही, गुंडगिरी, लूटमार सुरु आहे. लोकशाहीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मतदानाचे मोठे अस्त्र आपल्या हाती दिले आहे. बाबासाहेबांच्या संविधानाने टाटा, बिर्ला, अंबानी या मोठ्या उद्योगपतींना आणि शेतावर राबणारा शेतकरी, कामगारांनाही एक मताचा अधिकार दिला. निवडणुका येतात तेव्हा जनतेशी प्रतारणा करणारे, जनतेला सेवा करतोय सांगून मेवा खाणाऱ्यांना घरी बसविण्याचे मोठे अस्त्र बाबासाहेबांनी आपल्याला दिले आहे.
दरेकर पुढे म्हणाले, छत्रपती शिवरायांनी आपली राजधानी अत्यंत विश्वासाने या मातीत रायगडावर केली. त्या परिसरातील आपण मावळे आहोत. येथे होणारा जिल्हा परिषदेचा सदस्य हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, संस्कार मानणारा असायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींच्या लोकांना सोबत घेऊन कारभार केला. आता 18 पगड जातींवर हल्ला करण्याचे काम काही लोकं करताना दिसतात. लोकशाही मार्गाने त्यांना धडा शिकवला नाही तर याच गोष्टी वारंवार होणार आणि पुढील पिढीलाही दहशतीखाली जगावे लागेल. ज्या महाडला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आहे तो खऱ्या अर्थाने टिकवायचा असेल, छत्रपती शिवरायांचे संस्कार, आदर्श, आचार-विचार पुन्हा या मातीत प्रस्थापित करायचे असतील तर विरोधकांना घरी बसवून निलेश महाडिक, जामदार आणि चैत्राली दिघे यांना निवडून द्यावे लागणार आहे, असे आवाहन प्रवीण दरेकर यांनी केले.
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे नेते देशाचे नेतृत्व करत आहेत. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांसारखे तरुण, उमदे नेतृत्व लाभले आहे. आता जिल्हा परिषदेतही भाजपा-राष्ट्रवादीची सत्ता येणार आहे. जिल्हा परिषदेत आपली सत्ता, उमेदवार नसतील तर राज्याचा,केंद्राचा निधी आला तर त्यावर दरोडा टाकणारे पुढे असतील. त्यांना जिल्हा परिषदेवर पाठवायचे की आपल्या पैशाचे पहारेकरी पाठवायचेत हे ठरविणारी ही निवडणूक आहे असे दरेकर म्हणाले.