Madhuri Elephant Kolhapur
मुंबई/जयसिंगपूर : नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला गुजरातच्या 'वनतारा' येथून परत आणण्याच्या मागणीने कोल्हापूरमधून जोर धरला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या विषयावर आज मंगळवारी (दि. ५) उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जाणार असल्याचे ठरले आहे.
३४ वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदणी मठात आहे. ही हत्तीण परत आली पाहिजे, ही आपल्या सर्वांची इच्छा आहे. मठाने एक याचिका दाखल करावी आणि सोबतच राज्य सरकार सुद्धा एक याचिका दाखल करेल. हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरसह राज्य सरकार एक टीम तयार करेल आणि तसे सर्वोच्च न्यायालयात सांगितले जाईल. तिची निगा राखण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल. रेस्क्यू सेंटर, आहार याबाबतीत सुद्धा राज्य सरकार आपल्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाला आश्वस्त करेल. राज्य सरकार पूर्ण ताकदीने नांदणी मठाच्या सोबत आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
आजच्या उच्चस्तरीय बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, गणेश नाईक, पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, खासदार विशाल पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार विनय कोरे, सतेज पाटील, अमल महाडिक, विश्वजीत कदम, राजेंद्र पाटील-यड्रावकर, राहुल आवाडे, सदाभाऊ खोत, जिल्हाधिकारी अमोल येडगे, माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह सागर शंभुशेटे, भालचंद्र पाटील, आप्पासो भगाटे, डॉ. सागर पाटील, अॅड. मनोज पाटील, वनविभागाचे सचिव, वन्यजीवचे प्रधान मुख्य वनसंरक्षक, जिल्हा पोलीस प्रमुख, वनविभागाचे अप्पर मुख्य सचिव उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी १०.३० वाजता मुंबई येथील मंत्रालयातील मुख्यमंत्री समिती कक्षात बैठक बैठक झाली. नांदणी मठाधिश स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी 'महादेवी'बाबतची माहिती सांगितली. त्यांचबरोबर कोल्हापूर मठाचे स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, वरूर मठाचे स्वस्तिश्री धर्मसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, दिल्ली तिसारा मठाचे स्वस्तिश्री सौरभसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनीही हत्तीणीबाबात राज्य सरकारने धोरण राबविण्याची विंनती केली.
त्यानंतर या विषयावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. नांदणी (ता. शिरोळ) येथे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाची ‘माधुरी उर्फ महादेवी हत्तीण’ला पुन्हा मठात आणण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वातोपरी प्रयत्न केले जातील. नांदणी मठाकडून न्यायालयात याचिका दाखल करावी. तसेच शासनाला यात पार्टी करावे तरच आम्हाला शासनाचे म्हणणे मांडता येईल. महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी शासन संपूर्ण मदत करणार आहे. न्यायालयात भूमिका मांडून महादेवी हत्तीण परण आणणार असून दाखल केलेले गुन्हे मागे घेऊ, असे अश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे.
'दाखल केलेले गुन्हे मागे घेणार'
नांदणी येथील मठातून ‘महादेवी हत्तीण’ला २८ जुलै रोजी वनताराच्या पथकाने नेले होते. याच दिवशी संतप्त जमावाने आक्रोश करून झालेल्या दगडफेकीत पोलिसांच्या ७ गाड्या फुटल्या होत्या. यात १२ पोलीस जखमी झाले होते. याप्रकरणी १६४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरीकडे ‘महादेवी हत्तीण’ला वनतारा केंद्रात नेल्याने महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातून तीव्र संताप व्यक्त होवून गावागावातून मूकमोर्चा, ग्रामपंचायतीचे ठराव, गाव बंद, कँडल मार्चसह शेकडो मोर्चे काढण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घेणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीसा यांनी सांगितले.
याबाबत बोलताना सतेज पाटील म्हणाले की, लोकभावनेनंतर सरकार जागे झाले आहे. सरकारने निपक्षपणे यात भूमिका घ्यावी आणि प्रयत्न करावेत. इतिहास पुसण्याचा आणि बदलण्याचा प्रयत्न करू नये.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितले की, पेटा या प्राणी मित्र संघटनेच्या अहवालानंतर वनतारा येथे हत्तीणीला नेण्याचा प्रयत्न केला. आमच्याकडे सुस्थितीत असताना ४८ तासांच्या प्रवासानंतर ती अनफिट कशी झाली? याचा अहवाल घ्यावा अशी मागणी आम्ही केली. याशिवाय इतर कर्नाटक आणि आपल्या राज्यातील हत्तींची बातमी का बाहेर येत नाही? असा सवाल त्यांनी केला.
वनतारा आणि पेटा हे संशयाच्या भोवऱ्यात आहेत. अजित पवार आणि माझी महिती हीच आहे. राज्यातून गेलेले काही हत्ती हयात नाहीत. न्यायव्यवस्थेला चुकीची महिती देऊन सीमा भागातले देवस्थानातील हत्ती नेले जात आहेत. मुख्यमंत्र्यानी माधुरी हत्तीणीसाठी पुन्हा मठाच्या वतीने या याचिका दाखल करावी, त्याला सरकारही पार्टी राहील असे सांगितले. शासनाने आधी जागे झाले नाही. जनता रस्त्यावर उतरल्यावर शासन जागे झाले आहे. हिमालयाच्या कुशीतून अनेक हत्ती नेले आहेत. माझा पत्राचा जो उल्लेख होतोय ते २०११ चे आहे. तिचा जो माहुत होता तो आजारने त्रस्त असल्याने दुसरा माहुत येईपर्यंत तिचीव्यवस्था व्हावी या अनुषंगाने ते पत्र होते. मुख्यमंत्री जरी आश्वासन देत असले तरी जोपर्यंत हत्तीण परत मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.