

मिरज : मिरज येथील महाराणा प्रताप चौकात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. यावेळी माधुरी हत्तीला पुन्हा जिनसेन मठात परत आणण्यासाठी न्यायालयात लढू, असा इशारा देण्यात आला. या आंदोलनात मोठ्या संख्येने जैन समाज बांधव सहभागी झाले होते. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करण्यात आले. तसेच, पेटा या प्राणी संरक्षण संस्थेने एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोपही करण्यात आला.
महादेवी हत्तीला परत आणण्याच्या मागणीसाठी आज- शनिवार, दि. 2 ऑगस्टरोजी सकाळी 8 वाजता मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी आष्ट्याच्या अप्पर तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. नांदणी येथील जिनसेन मठातील ‘महादेवी हत्ती’ला ‘वनतारा रेस्क्यू सेंटर’ गुजरातमध्ये हलवण्यात आल्याच्या निषेधार्थ आष्टा शहरात तीव्र जनभावना उसळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि निशिकांतदादा युथ फाउंडेशन यांच्या वतीने प्रवीण माने यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 9.30 वाजता येथील बसस्थानक चौकात सह्यांची मोहीम आयोजिली आहे.