

कोल्हापूर: एका हत्तीणीवरील प्रेमापोटी हजारो नागरिकांनी एकत्र येऊन तिच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे, हे चित्र तसे दुर्मिळच. पण कोल्हापूरकरांनी आज (दि.३) हे चित्र सत्यात उतरवले आहे. आपली लाडकी हत्तीण 'माधुरी' हिला परत आणण्याच्या मागणीसाठी आज नांदणी येथून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या पदयात्रेत हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. "माधुरी परत करा" अशा घोषणांनी आणि याच आशयाच्या टोप्या परिधान केलेल्या नागरिकांच्या गर्दीने महामार्ग दुमदुमून गेला आहे.
आज सकाळी नांदणी येथून या पदयात्रेला सुरुवात झाली. यात्रेत केवळ तरुणच नव्हे, तर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलेही मोठ्या संख्येने सहभागी झाली आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर माधुरी परत मिळवण्याचा दृढनिश्चय दिसत होता. आंदोलकांनी परिधान केलेल्या "#JioBoycott" आणि "माधुरी परत करा" अशा आशयाच्या टोप्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. शिस्तबद्ध पद्धतीने निघालेली ही पदयात्रा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी केली होती.
या पदयात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संपूर्ण मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेषतः, आंदोलनाचा रोख पाहता सुरक्षेच्या कारणास्तव रिलायन्स समूहाच्या 'जिओ' पेट्रोल पंपावर अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हे पाऊल उचलल्याचे दिसून आले.
ही पदयात्रा सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास कोल्हापूर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. यात्रेच्या स्वागतासाठी आणि आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने जमण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शहरातही प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
कोल्हापुरात पोहोचल्यानंतर, पदयात्रेतील शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करणार आहे. एका मुक्या प्राण्यासाठी नागरिकांनी दाखवलेले हे प्रेम आणि एकजूट अभूतपूर्व असून, प्रशासनाने या भावनेचा आदर करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता या हजारो पावलांच्या आवाजाने प्रशासन जागे होणार का, आणि कोल्हापूरकरांना त्यांची लाडकी माधुरी परत मिळणार का, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.