प्रातिनिधीक छायाचित्र File Photo
मुंबई

LPG Supply Maharashtra: एलपीजी पुरवठ्यात शाळा आणि रुग्णालयांना प्राधान्य; उत्पादन दोन दिवसांत ११ हजार मेट्रिक टनांवर

महाराष्ट्रात घरगुती गॅसचा तुटवडा नाही; रिफायनरी उत्पादन वाढवून मागणी पूर्ण, पेट्रोल-डिझेलचाही पुरेसा साठा उपलब्ध

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: महाराष्ट्रात दररोज सरासरी सुमारे 9 हजार मेट्रिक टन एलपीजीची घरगुती वापरासाठी मागणी असते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी रिफायनरीमधील एलपीजी उत्पादन वाढविण्यात आले असून, गेल्या दोन दिवसांत दैनिक उत्पादन 9,000 मेट्रिक टनांवरून 11,000 मेट्रिक टनांपर्यंत वाढविण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात घरगुती एलपीजीचा कोणताही तुटवडा नसल्याचे राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने शुक्रवारी स्पष्ट केले.

घरगुती गॅसची मागणी पूर्ण करण्याइतके पुरेसे उत्पादन आणि साठा उपलब्ध असून व्यावसायिक एलपीजीच्या बाबतीत तुटवडा भासत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आले असून त्यानुसार रुग्णालये, शाळांमधील मध्यान्ह भोजन योजना, शासकीय आश्रमशाळा, सामुदायिक स्वयंपाकगृहे (कम्युनिटी किचन), तसेच शासकीय शाळा व महाविद्यालयांच्या मेस यांसारख्या अत्यावश्यक सेवांना प्राधान्य देण्यात येत आहे. सद्या उपलब्ध उत्पादनातून या सर्व गरजा पूर्ण होऊ शकतात, असा दावाही या विभागाने केला.

पेट्रोल- डिझेलचा पुरेसा साठा

घरगुती वापरासाठीच्या पाईप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) चा देखील पुरेसा साठा उपलब्ध आहे. इंधनाच्या बाबतीतही राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी राज्यातील रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत असून दररोज सुमारे 15,000 किलो लिटर पेट्रोल आणि 38,000 किलो लिटर डिझेल या मागणीची पूर्तता केली जात आहे. त्यामुळे इंधन पुरवठ्याबाबत नागरिकांनी काळजी करू नये असे आवाहन या विभागामार्फत करण्यात आले आहे.

राज्यात घरगुती गॅस सिलिंडर बुक करण्याची मुदत पूर्वी 21 दिवस होती. आता ती 24 दिवस केली आहे. पूर्वी बुकिंगनंतर 24 तासांत सिलिंडर मिळायचा, आता 48 तास लागत आहेत.

व्यावसायिक एलपीजीच्या बाबतचा 60 टक्के पुरवठा आखाती देशातून यायचा. तो कमी दरात मिळायचा. पण आखाती देशातील युद्धामुळे त्यावर परिणाम झाला आहे. त्यावर उपाय म्हणून आपण देशात 30 टक्के अधिक उत्पादन वाढविले आहे. पण याचा दर थोडा महाग आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT