Lok Sabha Seat Increase Pudhari
मुंबई

Lok Sabha Seat Increase: लोकसभेच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ? महाराष्ट्राला मिळणार २४ नवे मतदारसंघ

राज्यातील लोकसभा मतदारसंघांची संख्या ४८ वरून ७२ होण्याची शक्यता; परिसीमन आयोगाची नियुक्ती होणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: लोकसभा मतदारसंघांच्या संख्येत वाढ करण्यात येणार असून, प्रत्येक राज्यातील विद्यमान लोकसभा मतदारसंघांमध्ये ५० टक्क्यांची भर पडणार असल्याचे वृत्त ‘पुढारी’ने सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते.

शुक्रवारी (दि. २७) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याच धर्तीवर विधेयकाचे प्रारूप मांडण्यात आले आहे. महाराष्ट्रात सध्या असलेल्या ४८ लोकसभा मतदारसंघांत आता २४ मतदारसंघांची भर पडणार आहे.

हे मतदारसंघ कशा प्रकारे आखले जातील, त्यांचे भौगोलिक परिसीमन कसे असेल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती स्पष्ट झालेली नसली, तरी यासंदर्भात लवकरच विधेयक पारित झाल्यानंतर परिसीमन आयोग नेमला जाणार आहे.

आता जनगणनेची वाट न पाहता १९७१ ची लोकसंख्या आधारभूत मानून मतदारसंघांची फेररचना होणार आहे. भाजपला संपूर्ण देशात असलेले संघटनात्मक जाळे वापरून या निर्णयामुळे आपण पुन्हा एकदा सत्तेवर येऊ शकतो, असे वाटत असावे हा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.

लोकसभेत मांडल्या जाणाऱ्या या विधेयकामुळे ‘इंडिया’ आघाडीत दोन गट पडण्याची शक्यता असून, विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या प्रमुख आणि शरद पवार राष्ट्रवादी यांच्यामध्ये सुरू असलेल्या घडामोडींमुळे ‘इंडिया’ आघाडी संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

विधेयकाला पाठिंबा द्यायचा असेल, तर तो बाहेरून कशाला सत्ता पक्षामध्ये जाणे योग्य ठरेल, असे शरद पवार राष्ट्रवादीतील काही ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे. मात्र, विधेयक पारित होईपर्यंत यासंदर्भात कोणतीही हालचाल होण्याची शक्यता नसून पुढे यासंदर्भात योग्य तो विचार केला जाईल, असे सांगण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. अमर काळे या खासदारांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे. मात्र, पक्षादेश जारी झाल्यानंतर त्याचे पालन करत सर्व खासदारांना विधेयकाच्या बाजूने किंवा विरोधात पक्षाच्या निर्णयानुसार मतदान करावे लागेल. असे मतदान केले नाही तर खासदारकी जाऊ शकते.

खासदारकीच्या कारकीर्दीला तीन वर्षे बाकी असताना यासंदर्भात कोणताही वेगळा निर्णय होण्याची शक्यता दिसत नाही, असे बोलले जाते. त्यामुळे प्रारंभी विरोध करायचा आणि पक्षादेशाचा आदर करावा लागला असे तर सांगायचे नाही ना, अशीही शक्यता व्यक्त होत आहे.

शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने यासंदर्भातील ठरावाला मान्यता दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडी सुरू झाल्या. संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्यात यावेळी प्रथमच काहीसा तणाव निर्माण झाला.

राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम

दिल्लीत मांडले जाणारे हे विधेयक महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडवून आणणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय विरोधक असलेले शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे या विधेयकाला पाठिंबा देणार असल्यामुळे ते यानिमित्ताने सत्ताधारी आघाडीत सामील होतात की काय, असा प्रश्न केला जात आहे. एप्रिलमध्ये या आघाडीने या विधेयकाला पाठिंबा देण्याचे नाकारले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT