

मुंबई: शालेय विद्यार्थ्यांना सकस आणि सुरक्षित खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत एप्रिल ते १९ नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत राज्यातील ४२२ शाळा आणि त्यांच्या परिसरातील उपाहारगृहांची तपासणी करण्यात आली.
यात शाळांच्या ५० मीटर परिसरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १३८ उपाहारगृहांपैकी ६९ उपाहारगृहे बंद करण्यात आली, तर १९ उपाहारगृहांचे परवाने निलंबित करण्यात आले. कोकणात १५९ शाळांची तपासणी करण्यात आली.
शाळांच्या ५० मीटर परिसरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६४ उपाहारगृहांपैकी २७ बंद करण्यात आली, तर एकाचा परवाना निलंबित करण्यात आला. नाशिक विभागात ६९ शाळांची तपासणी करताना परिसरातील नियमभंग करणाऱ्या २७ उपाहारगृहांपैकी २३ बंद करण्यात आली, तर १४ उपाहारगृहांचे परवाने निलंबित करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ६९ शाळांच्या तपासणीत आठ उपाहारगृहे बंद करण्यात आली. नागपूरमध्ये ४८ शाळांच्या तपासणीनंतर परिसरातील दोन आणि अन्य नियमभंगप्रकरणी एक उपाहारगृह बंद करण्यात आले.
पुण्यात ४३ शाळांची तपासणी करून २९ उपाहारगृहांपैकी पाच बंद करण्यात आली. अमरावतीमध्ये ३२ शाळांच्या तपासणीत परिसरातील आठ उपाहारगृहांपैकी दोन बंद, तर चार परवाने निलंबित करण्यात आले. अन्य उल्लंघनाप्रकरणी दोन उपाहारगृहे बंद करण्यात आली.
मुंबईत सर्वांत कमी तपासणी झाली. अवघ्या दोन शाळांची तपासणी करण्यात आली. या शाळांच्या परिसरात नियमांचे उल्लंघन करणारी दोन उपाहारगृहे आढळली असून, दोन्ही बंद करण्यात आली.